मुंबई : सोशल मीडियावर एका नवजात बाळाचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो व्हायरल होण्याचं कारण म्हणजे बाळाचे एक्स्प्रेशन. ब्राझीलच्या रिओ डी जनेरेमध्ये एका महिलेने 13 फेब्रुवारी रोजी मुलीला जन्म दिला. पण डॉक्टरांनी नाळ कापण्याआधी चिमुकलीला रडवण्याचा प्रयत्न केला असता तिने असा प्रतिसाद दिला की डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. तिचे हे हावभाव कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहेत. रागात असलेल्या या चिमुकलीचा चेहरा पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर मात्र हसू उमटत आहे.


जन्मानंतर ही चिमुरडी रडली नव्हती. तिची प्रकृती उत्तम आहे का आणि तिचे फुफ्फुसं योग्यरित्या काम करत आहेत का हे तपासण्यासाठी डॉक्टरांनी नाळ कापण्याआधी तिला रडवण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी तिचा प्रतिसाद अतिशय संतप्त होता. तिचा चेहरा पाहून डॉक्टरांना मात्र हसू आवरता आलं नाही.


मुलीची आई डायने डी येसूस बार्बोसाने एका स्थानिक फोटोग्राफर रॉड्रिगो कुन्स्टमानची नेमणूक केली होती, जेणेकरुन नवजात बाळाचे अविस्मरणीय क्षण कॅमेऱ्यात कैद करता येतील. त्यानेही मुलीच्या जन्मानंतर तिचे अनेक क्षण कैद केले. त्याने बाळाचे आणि तिच्या कुटुंबाचे फोटो फेसबुकवरही शेअर केले आहेत.



फोटोग्राफर रॉड्रिगोने सांगितलं की, "जन्मानंतर ती रडली नव्हती. त्यामुळे डॉक्टरांनी तिला रडवण्याचा प्रयत्न केला असता तिने डोळे मोठे केले, पण रडली नाही. डॉक्टर तिला रड असं म्हटल्यानंतर तिने आपला चेहरा गंभीर केला. मात्र डॉक्टरांनी तिची नाळ कापल्यानंतर ती रडू लागली."



मुलीची आई डायने म्हणाली की, "माझी लेक आता मीमचा विषय बनली आहे. डायपर बदलतानाही तिच्या कपाळावर आठ्या पडतात. चिमुकलीचं नाव इसाबेला ठेवण्यात आलं आहे.