IND vs PAK : भारताने टी 20 विश्वचषकाच्या (T20 World Cup 2022) पहिल्याच सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. टीम इंडियानं पाकिस्तानचा चार विकेटनं धूळ चारली. विराट कोहली आणि हार्दिक पांड्यानं भारताला अशक्यप्राय विजय मिळवून दिला. विराट आणि हार्दिकनं पाकिस्तानच्या विजयाचा घास हिसकावला. विराट कोहलीनं 82 तर हार्दिक पांड्यानं 40 धावांची खेळी केली.  दरम्यान, भारतानं पाकिस्तानवर विजय मिळवत युएईमधील विश्वचषकातील पराभवाचा वचपा काढला आहे. विराट कोहलीनं 82 धावांची खेळी केली. तर हार्दिक पांड्यानं तीन विकेट आणि 40 धावांची अशी अष्टपैलू कामगिरी केली. त्याशिवाय अर्शदीपने तीन विकेट घेतल्या. भारतीय संघाच्या विजयानंतर देशभरात जल्लोष साजरा केला जात आहे. या विजयानंतर क्रीडा चाहत्यांपासून ते राजकीय नेते आणि आजी-माजी क्रिकेटपटूंनी आनंद साजरा केला.


160 धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली होती. राहुल आणि रोहित स्वस्तात माघारी परतले होते. त्यानंतर सूर्यकुमार आणि अक्षर पटेल यांनाही चमकदार कामगिरी करता आली नाही. सातव्या षटकात भारतीय संघाची दैयनीय अवस्था झाली होती. भारताने चार गड्यांच्या मोबदल्यात फक्त 31 धावा केल्या होत्या. भारतीय संघ पराभवाच्या छायेत होता. पाकिस्तानचा संघ भारतावर वरचढ होता. पण विराट कोहली आणि हार्दिक पांड्यानं संयमी फलंदाजी करत सामना फिरवला. सुरुवातीला दोघांनी संयमी फलंदाजी केली, जम बसल्यानंतर दोघांनीही फटकेबाजी केली. विराट आणि हार्दिक यांनी 113 धावांची भागिदीरी करत सामना फिरवला. यासह पाकिस्तानविरोधात सर्वात मोठ्या भागिदारीचा विक्रम केलाय. 20 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हार्दिक पांड्या बाद झाला. त्यानंतर भारतीय संघ बॅकफूटवर जातोय का असं वाटलं. त्यातच भर म्हणून कार्तिकही बाद झाला. पण विराट कोहलीनं फटकेबाजी करत सामना जिंकून दिला. अखेरच्या चेंडूवर एक धाव काढायची होती, तेव्हा अश्विननं विजयी फटका मारला.  


रोहित शर्माच्या टीम इंडियानं ऑस्ट्रेलियातल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात पाकिस्तानला लोळवून सनसनाटी विजयी सलामी दिली. टीम इंडियानं हा सामना चार विकेट्सनी जिंकला. या सामन्यात पाकिस्ताननं भारताला विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सातव्या षटकांत चार बाद 31 अशी केविलवाणी अवस्था झाली होती. पण विराट कोहली आणि हार्दिक पंड्यानं पाचव्या विकेटसाठी 113 धावांची झुंजार भागीदारी रचली. त्यांच्या या भागिदारीनं भारताला विजयाच्या दिशेनं नेलं. हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिक मोक्याच्या क्षणी बाद झाले. पण विराट कोहली आणि रवीचंद्रन अश्विननं भारताच्या सनसनाटी विजयावर शिक्कामोर्तब केलं. टीम इंडियाला अखेरच्या 18 चेंडूंत विजयासाठी 48 धावांची आवश्यकता होती. त्या परिस्थितीत भारतीय फलंदाजांनी शाहिन आफ्रिदीच्या षटकात 17 धावांची, हॅरिस रौफच्या षटकात 15 धावांची आणि मोहम्मद नवाझच्या अखेरच्या षटकात 16 धावांची लूट केली.