Boris Johnson India Tour : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन 21 एप्रिलपासून भारत दौऱ्यावर आहेत. मात्र, भारत दौऱ्यापूर्वी जॉनसन पुन्हा एकदा वादात सापडले असून विरोधक पुन्हा एकदा त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. मिळालेल्या रिपोर्टनुसार, बोरिस जॉनसन यांच्यावर पुन्हा एकदा पार्टी प्रकरणातील आणखी एका आरोपांवरून विरोधकांनी निशाणा साधला आहे. 


काय आहे प्रकरण?
ब्रिटनमध्ये कोरोना काळात रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. प्रत्येकाने नियमांचे पालन करणे बंधनकारक होते. मात्र यावेळी जॉनसन यांनी पार्टी केल्याचा आरोप आहे. नवीन प्रकरण नोव्हेंबर 2020 मध्ये 10 डाउनिंग स्ट्रीटवरून कम्युनिकेशन डायरेक्टर ली केन यांच्या निरोप समारंभासाठी आयोजित पार्टीशी संबंधित आहे. बोरिस जॉनसनवर आरोप आहे की, ही पार्टी त्यांच्या सांगण्यावरून आयोजित करण्यात आली होती.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलीस सध्या अशा 12 लॉकडाउनमधील पार्ट्यांची चौकशी करत आहेत आणि असे मानले जाते की यापैकी सुमारे 6 पार्टी बोरिस जॉनसन यांच्याशी संबंधित आहेत.


रेनर यांनी मागितला राजीनामा
याप्रकरणावरून विरोधकांनी जॉनसन यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोध आणखी तीव्र केला आहे. लेबर पार्टीच्या उपनेत्या अँजेला रेनर यांनी सांगितले की, पंतप्रधानांनी केवळ पार्ट्यांनाच हजेरी लावली नाही तर कार्यक्रमावरही भर दिला. रेनरने जॉनसन यांच्यावर आरोप करत म्हटलं आहे की, पंतप्रधानांनी प्रत्येक पावलावर देशातील जनतेची दिशाभूल केली आहे. जेव्हा ब्रिटनचे लोक कोरोना संकटात होते आणि त्यांच्या घरात कैद होते, तेव्हा जॉनसन यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन करत पार्टीचं आयोजन केलं. याला रेनर यांनी पंतप्रधान कार्यालयाचा अपमान म्हटलं आहे. तसेच देशाला चांगल्या नेतृत्वाची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.


बोरिस यांना ठोठवण्यात आला दंड  
पार्टी केल्याच्या एका प्रकरणात बोरिस जॉनसन यांना दंड ठोठवण्यात आला आहे. ही घटना 19 जून 2021 रोजी घडली. कोरोना निर्बंध असताना बोरिस जॉनसन यांच्याकडून वाढदिवसानिमित्त पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. आता या प्रकरणात पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना दंड ठोठावण्यात आला आहे. दंड भरल्यानंतर जॉनसन यांनी या चुकीबद्दल माफीही मागितली आहे. दरम्यान, जॉनसन यांच्या दंडाची रक्कम किती आहे याबाबत  अद्याप काही स्पष्ट झालेलं नाही. यामुळे बोरिस जॉनसन कार्यकाळात असताना नियमांचे उल्लंघन करणारे आणि दंडाला सामोरे जाणारे ब्रिटनचे पहिले पंतप्रधान बनले आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha