इस्लामाबाद: पाकिस्तानमध्ये बलूच आर्मी आणि पाकिस्तानी सैन्यात घमासान पाहायला मिळत असून बलूच आर्मीने पाकिस्तानची (Pakistan) ट्रेन हायजॅक केल्यानंतर पाकिस्तानी सैन्यानेही ठोक भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्य दलावर हल्ला करण्यात आला असून बीएलए म्हणजे बलूच आर्मीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात 90 पाकिस्तानी सैन्य जवानांना ठार करण्यात आल्याचा दावा बीएलएकडून करण्यात येत आहे. त्यामुळे, पाकिस्तान आणि बीएलए यांच्यातील रणसंग्राम अधिक तीव्र झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, बीएलएने पाकिस्तानमधील जाफर एक्सप्रेस हायजॅक केल्यानंतर पाकिस्तानी आर्मीने ऑपरेशन रावबून बलूच आर्मीतील (BLA) 30 जवानांना ठार करत ट्रेनमधील ओलीस ठेवलेल्या प्रवाशांची सुटका केली होती. त्यानंतर, बलूच आर्मीने प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानी कॅम्पवर हल्ला चढवला आहे. या हल्ल्यात बस जळून खाक झाली असून बसमधील जवान ठार झाल्याने पुलवामा हल्ल्याची पुनरावृत्ती झाल्याचं बोललं जात आहे.
द बलुचिस्तान पोस्टच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी सैन्याच्या कॅम्पवर नोशिकी येथे हल्ला करण्यात आला आहे. आरसीडी हायवेवर पाकिस्तानी सैन्य दलाच्या तुकडीवर बलूच आर्मीकडून हा हल्ला करण्यात आल्याची स्थानिक सूत्रांची माहिती आहे. येथे सुरुवातीला काही स्फोट झाले, त्यानंतर मोठ्या प्रमाणात गोळीबाराची घटना घडली आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षा रक्षक आणि रुग्णवाहिकांनी घटनास्थळी धाव घेतली असून रुग्णालयातही जमर्जन्सीचा इशारा देण्यात आला आहे. पाकिस्तानी सैन्य दलाच्या तुकडीवर करण्यात आलेल्या हल्ल्याची जबाबदारी बीएलएने स्वीकारली आहे. बलूच आर्मीचे प्रवक्ता जीयंद बलूच यांनी याबाबत माहिती दिली. बीएलएची फियादीन तुकडी मजीद ब्रिगेडने काही तासांपूर्वी नोकिशी येथे आरसीडी हायवेवर पाकिस्तानी सैन्य दलाच्या तुकडीला लक्ष्य केले. या तुकडीत 8 पाकिस्तानी सैन्य दलाच्या बसेसचा समावेश होता. त्यापैकी, एक बस पूर्णपणे नेस्तनाबू झाली आहे. या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याचे 90 जवान ठार झाल्याचा दावाही बलूच आर्मीकडून करण्यात येत आहे.
बलूच आर्मीने जाफर एक्सप्रेसचे केले होते अपहरण
बलूच लिबरेशन आर्मीने बोलानच्या मश्काफमध्ये गुडालार आणि पिरू कुंरी दरम्यान जाफर एक्सप्रेसवर हल्ला केला. हा एक डोंगराळ भाग आहे, जिथे 17 बोगदे आहेत, त्यामुळे ट्रेन कमी वेगाने चालवावी लागते. याचा फायदा घेत बीएलएने ट्रेनवर हल्ला केला. सर्वप्रथम मश्काफमधील बोगदा क्रमांक 8 मध्ये बलूच आर्मीने रेल्वे ट्रॅक उडवून दिला. त्यामुळे जाफर एक्स्प्रेस रुळावरून घसरली. त्यानंतर बीएलएने गोळीबार सुरू केला. त्यात रेल्वे चालकाचा मृत्यू झाला होता. या ट्रेनमध्ये सुरक्षा दल, पोलीस आणि आयएसआयचे एजंट प्रवास करत होते. हे सर्वजण पंजाबला जात होते. त्यांनी बीएलएच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले, परंतु बीएलएने ट्रेन ताब्यात घेतली.
बलुचिस्तानच्या बोलान जिल्ह्यात हल्ला
जाफर एक्स्प्रेस सकाळी 9 वाजता क्वेट्टाहून पेशावरसाठी रवाना झाली होती. सिबी येथे येण्याची वेळ 1.30 होती. याआधीही दुपारी एकच्या सुमारास बलुचिस्तानच्या बोलान जिल्ह्यातील मशकाफ भागात हल्ला झाला होता. ट्रेन अजूनही पूर्णपणे बीएलए फायटरच्या ताब्यात आहे. गेल्या वर्षी, 25 आणि 26 ऑगस्ट 2024 च्या मध्यरात्री, बीएलएने या ट्रेनच्या मार्गावरील कोलपूर ते माच दरम्यानचा पूल उडवला होता. त्यामुळे रेल्वेसेवा ठप्प झाली होती. 11 ऑक्टोबर 2024 पासून रेल्वे सेवा पुन्हा सुरू झाली.
हेही वाचा
शेतकऱ्याच्या 14 वर्षीय मुलाचे अपहरण, 60 लाख रुपयांची मागणी; 5 दिवसांपासून तपास पण थांगपत्ता नाही