WHO On Bird Flu : जगभरात 2020 पासून कोरोना (Coronavirus) महामारीने कहर माजवला आहे. या विषाणूमुळे अनेकांना प्राण गमवावे लागलं आहेत. अद्यापही याचा धोका कमी झालेला नाही. अशातच आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO-World Health Organization) आणखी एका विषाणूबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. बर्ड फ्लू (Bird Flu) मुळे पुन्हा एकदा जगाची चिंता वाढली आहे. आता पक्षांव्यतिरिक्त इतर सस्तन प्राण्यांमध्येही बर्ड फ्लूचा फैलाव झाला आहे. मिंक (Mink), ऑटर (Otters), कोल्हा (Fox), सील (Sea lions) या सस्तन प्राण्यांनाही H1N1 फ्लूचा संसर्ग झाला आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. WHO ने म्हटलं आहे की, सस्तन प्राण्यांमधील बर्ड फ्लूचा संसर्ग पाहता मानवांमध्ये देखील बर्ड फ्लू संसर्ग होण्याचा धोका आहे, कारण मानव देखील एक प्रकारचा सस्तन प्राणी आहे.
कोरोनानंतर बर्ड फ्लूने वाढवली चिंता
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान घाबरून जाऊ नका, असं आवाहनही केलं आहे. WHO प्रमुख टेड्रोस अदनोम घेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी सांगितलं आहे की, गेल्या काही आठवड्यांमधील अहवालात समोर आलं आहे की, बर्ड फ्लूचा संसर्ग सस्तन प्राण्यांमध्येही पसरत आहे. मिंक (Mink), ऑटर (Otters), कोल्हा (Fox), सील (Sea lions) या सस्तन प्राण्यांमधील एव्हीयन इन्फ्लूएंझा (Avian Influenza) म्हणजेच H1N1 फ्लू (Bird Flu) च्या प्रकरणांवर बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. त्यांनी बुधवारी ही माहिती दिली.
WHO चं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन
दरम्यान, WHO प्रमुखांनी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेच्या मते H1N1 फ्लू (Bird Flu) सध्या कमी धोक्याच्या चौकटीत आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. याचा मानवासाठी धोका नाकारता येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगण्याची गरज आहे. पण, घाबरण्याचं कारण नाही. WHO ने बर्ड फ्लूपासून बचाव करण्यासाठी काही सूचना केल्या आहेत. त्यानुसार, कोणत्याही आजारी किंवा मृत वन्य प्राणी किंवा पक्ष्याला स्पर्श करू नका किंवा त्याच्या जवळ जाऊ नका. असा प्राणी आढळल्यास स्थानिक अधिकारी किंवा प्रशासनाला याबाबतची माहिती द्या. यासोबतच आजारी किंवा मृत कोंबड्यांबाबत जास्त खबरदारी बाळगण्याची आणि काळजी घेण्याची गरज आहे.
कसा पसरतो बर्ड फ्लू?
डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, बर्ड फ्लू संक्रमित पक्ष्यांना स्पर्श करून, संक्रमित प्राण्यांच्या विष्ठेला किंवा राहण्याच्या जागेच्या संपर्कात आल्यावर आणि संक्रमित प्राणी आणि पक्षी खाल्ल्यास याचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. डब्ल्यूएचओचे प्रवक्ते ख्रिश्चन लिंडमेयर यांनी सांगितले की, गेल्या वर्षी जगभरात चार जणांना एव्हियन फ्लूची (H5N1) लागण झाली होती, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला.
एव्हीयन फ्लूमुळे साथीच्या रोग पसरण्याची शक्यता
डब्ल्यूएचओ प्रवक्त्यांनी पुढे सांगितलं की, 'बर्ड फ्लू हा मानवी आरोग्यासाठी सतत धोका आहे. भविष्यात यामुळे साथीचा रोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. या फ्लूमुळे साथीचे रोग पसरू शकतात. त्यामुळे यावर लक्ष ठेवणं महत्वाचं आहे. या विषाणूमधील मानवी आरोग्यावर परिणाम करणारे कोणतेही बदल जाणून घेण्यासाठी प्राण्यांमध्ये पाळत ठेवणं महत्त्वाचं आहे.'