Elon Musk Children News : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, न्यूरालिंक स्पेसएक्स आणि टेस्ला कंपनीचा मालक इलॉन मस्कला तब्बल 12 अपत्य असल्याचं समोर आलं आहे. न्यूरालिंक कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या शिवोन जिलिस ही महिला त्याच्या या 12 व्या मुलाची आई असल्याचं स्पष्ट झालं आहे. 2021 साली शिवोन जिलिसने इलॉन मस्कच्या जुळ्या मुलांना जन्म दिला होता. इलॉन मस्कने ही बातमी आतापर्यंत लपवली होती. 


ब्लूमबर्गच्या अहवालात इलॉन मस्कच्या या 12 व्या मुलाबद्दल उल्लेख करण्यात आला आहे. इलॉन मस्कला 12 मुलं असून त्यापैकी सहा जणांचा जन्म गेल्या पाच वर्षांमध्ये झाला आहे. त्यामधील तीन मुलं ही संगितकार ग्रिम्सपासून झाली आहेत तर तीन मुलांची आई ही शिवोन जिलिस असल्याचं ब्लूमबर्गने म्हटलं आहे. असं असलं तरी इलॉन मस्क वा शिवोन जिलिस यांनी मात्र अद्याप या बातमीला दुजोरा दिला नाही.


ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, 2020 मध्ये संगीतकार ग्रिम्स हिने इलॉन मस्कच्या एका मुलाला जन्म दिला होता. त्या मुलाबद्दल सर्व काही गुप्त ठेवण्यात आले होते, परंतु इलॉन मस्कने त्याच्या चरित्रात त्याच्याबद्दल लिहिले. 2021 मध्येच इलॉन मस्कला शिवॉनपासून जुळी मुले झाली.


इलॉन मस्कबद्दल माहिती देताना कॅनेडियन लेखक जस्टिन विल्सन याने म्हटलं आहे की, इलॉन मस्कला आधीच्या लग्नापासून 6 मुले आहेत. त्यांचा पहिला मुलगा, नेवाडा अलेक्झांडर 2002 मध्ये जन्माला आला होता. परंतु 10 आठवड्यांनंतर त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याला झेवियर आणि डॅमियन असे जुळी मुलं झाली. यानंतर त्याला काई, सॅक्सन आणि डॅमियन अशी तीन मुले झाले.


ट्रान्सजेंडर असलेल्या झेवियर या मुलाने 2022 मध्ये त्याच्या नावातून मस्कचे नाव काढून टाकले. तो त्याच्या बायोलॉजिकल वडिलांशी संबंध ठेऊ इच्छित नाही असं त्याने म्हटलं होतं. 


तर शिवोन जिलिसपासून झालेल्या जुल्या मुलांची नावं अझर आणि स्ट्रायडर अशी नावं आहेत. इलॉन मस्कच्या 12 व्या मुलाचे नाव आणि लिंग काय आहे ते अद्याप समोर आलं नाही.