ढाका : चार वर्षांपूर्वी आत्महत्या केलेल्या महिलेच्या अंत्यसंस्कारांविषयी अखेर कोर्टाने निर्णय घेतला आहे. महिलेचा मृतदेह पुरण्यात यावा, असा निर्णय बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने घेतला.
हिंदू महिला आणि मुस्लिम पुरुषाच्या लग्नाशी निगडीत हा ऐतिहासिक निर्णय बांगलादेशच्या सुप्रीम कोर्टाने सुनावला.
2013 मध्ये संबंधित हिंदू महिलेने मुस्लिम पुरुषासोबत विवाह केला होता. लग्नानंतर तिने धर्म परिवर्तन केल्याचा दावा केला जात आहे, मात्र दोघांच्याही कुटुंबीयांनी या लग्नाचा स्वीकार केला नव्हता. उलट हे नातं तोडण्यासाठीच दोघांवर दबाव आणला जात होता.
कुटुंबीयांच्या दबावामुळे त्रस्त झालेल्या नवऱ्याने लग्नानंतर वर्षभरातच आत्महत्या केली. पतीच्या विरहामुळे पत्नीनेही त्याच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन महिन्यात आपली जीवनयात्रा संपवली.
महिलेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी तिच्या मृतदेहाचं दफन करण्यास विरोध केला. एकीकडे महिलेने धर्मपरिवर्तन केल्याचा दावा केला जात होता, तर दुसरीकडे तिच्या माहेरच्या मंडळींनी आपल्या मुलीने आत्महत्येपूर्वी धर्मात 'वापसी' केल्याचं म्हटलं. त्यामुळे तिचा मृतदेह जाळावा की पुरावा असा प्रश्न निर्माण झाला.
महिलेच्या कुटुंबाने कोर्टाचा दरवाजा ठोठवला आणि हिंदू परंपरेनुसार तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करु देण्याची मागणी केली. सासरच्या व्यक्ती मात्र तिच्या मृतदेहाचं दफन करावं, या मागणीवर अडून होत्या.
बांगलादेशमध्ये या प्रकरणाची खूप चर्चा झाली. हे प्रकरण अखेर सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचलं. महिलेने इस्लाम धर्माचा स्वीकार केल्यामुळे तिचं पार्थिव दफन केलं जावं, असे आदेश कोर्टाने दिले. गेल्या चार वर्षांपासून तिचा मृतदेह शवागारात ठेवला होता.
दहन की दफन? 'ती'च्या मृतदेहाबाबत चार वर्षांनी निर्णय
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Apr 2018 10:10 PM (IST)
चार वर्षांपूर्वी आत्महत्या केलेल्या महिलेच्या मृतदेहाविषयीचा वाद शमला असून त्याचे दफन करण्यात यावे, असा निर्णय बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -