Bangladesh Five Death to Sitrang Cyclone : बांगलादेशामध्ये 'सितरंग' चक्रीवादळामुळे (Sitrang Cyclone) पाच जणांचा मृत्यू झाला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्टा तयार झाल्याने सितरंग चक्रीवादळ तयार झालं. त्याचा फटका बांगलादेशला बसला आहे. तर भारतातही या चक्रीवादळाचा परिणाम होणार आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मेघालयमध्ये शाळा बंदा ठेवण्यात आल्या आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 


बांगलादेशमध्ये पाच जणांचा मृत्यू


बांगलादेशला सितरंग चक्रीवादळाचा फटका बसला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने बांगलादेशमध्ये सोमवारी पाच जणांचा मृत्यू झाला. एएफपी वृत्तसंस्थेने आपत्ती मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाचे प्रवक्ते निखिल सरकार यांच्या हवाल्याने माहिती दिली आहे की, बरगुना, नरेल, सिराजगंज आणि भोला बेट जिल्ह्यात नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सितरंग चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढणार आहे. बांगलादेशातील सितरंग चक्रीवादळाचा वाढता धोका पाहता नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आलं आहे. सखल भागातून हजारो नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. देशात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. 


श्चिम बंगालमध्ये हाय अलर्ट


सितरंग चक्रीवादळाची (Cyclone Sitrang) तीव्रती वाढली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्टा तयार झाल्याने निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम भारतातही दिसत आहे. कोलकाता आणि परिसरात मुसळधार पावसाला सुरूवात झाली असून पश्चिम बंगालमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हे चक्रीवादळ ईशान्येकडे सरकण्यास सुरुवात झाली आहे. हे चक्रीवादळ जमिनीकडे सरकल्यावर याची त्याची तीव्रता अजून वाढेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.


पूर्वेकडील राज्यांवर सीतारंग चक्रीवादळाचा परिणाम 


भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, सीतारंग  चक्रीवादळ मध्यरात्री 2.30 वाजता बांगलादेशात ढाकापासून सुमारे 90 किमी ईशान्य, आगरतळापासून 60 किमी उत्तर-वायव्य दिशेला आहे. पुढील तीन तासांत हे चक्रीवादळ कमकुवत होईल. तर पुढील सहा तासांत कमी दाबाचे क्षेत्र कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.


'या' राज्यांमध्ये आज पावसाची शक्यता


सीतारंग चक्रीवादळामुळे भारताच्या काही भागात पावसाची शक्यता आहे, त्यामुळे खबरदारी म्हणून पश्चिम बंगालमधील सखल भागातून हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. 100 हून अधिक मदत केंद्रं स्थापन करण्यात आली आहेत. हवामान खात्यानुसार, मंगळवारी (25 ऑक्टोबर) रोजी अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.