Pakistan Power Crisis : पाकिस्तानातील वीज संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने रात्री 10 नंतर लग्न समारंभांवर बंदी घातली आहे. बुधवारपासून या बंदीची अंमलबजावणी होणार आहे. यासोबतच लग्नात पाहुण्यांना एकच डिश सर्व्ह करण्याची परवानगी दिल्याची बातमी आहे. या नवीन निर्बंधाबाबत लवकरच अधिसूचना जारी करण्यात येणार आहे.
विजेची मागणी वाढली
जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सूचनेनुसार ही बंदी लागू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानमध्ये वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या अत्यंत गंभीर बनली आहे. गेल्या एक महिन्यापासून हा देश या समस्येला तोंड देत आहे. जागतिक इंधनाच्या किमतीत झालेली वाढ, स्थानिक चलनाच्या किमतीत झालेली घसरण आणि उन्हाळ्यात विक्रमी वाढ झाल्यामुळे पाकिस्तानमधील विजेची मागणी वाढली आहे.
निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना
सरकारने पोलीस आणि प्रशासनाला या बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. दुसरीकडे पाकिस्तनाच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने सरकारी कार्यालयांमध्ये शनिवारची साप्ताहिक सुट्टी बहाल करण्यास मंजुरी दिली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री मरियम औरंगजेब यांनी मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर ही घोषणा केली.
तत्पूर्वी पंतप्रधान शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली वीज बचतीबाबत बैठक झाली. या बैठकीत ऊर्जा विभागाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेल आणि वायूच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे विजेच्या टंचाईला तोंड देण्यासाठी ऊर्जा संवर्धन योजना सादर केली. वित्त विभागानेही एक योजना सादर केली. बैठकीत मंत्रिमंडळाने पुन्हा शनिवार हा सुट्टीचा दिवस जाहीर करण्यास मान्यता दिली, मात्र ऊर्जा वाचवण्यासाठी सायंकाळी 7 वाजेपर्यंत बाजार बंद ठेवण्याबाबत कोणताही निर्णय होऊ शकला नाही.
कर्मचाऱ्यांच्या इंधन कोट्यात कपात
यासोबतच मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या इंधन कोट्यात 40 टक्के कपात करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. अनावश्यक प्रवास टाळण्यासाठी आणि ऊर्जा बचतीबाबत जनजागृती मोहीम राबवण्यासाठी सरकारी बैठका ऑनलाइन घेण्याचेही प्रस्ताव देण्यात आले आहेत. या प्रयत्नांमुळे ऊर्जा वापर दहा टक्क्यांनी कमी व्हावा, असा पाकिस्तानी सरकारचा प्रयत्न आहे.