मराठ्यांचे वंशज आजही पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये जगत आहेत. महाराष्ट्रापासून जवळपास 1 हजार 500 किलोमीटर दूर अंतरावर बलुचिस्तान आहे. पाकिस्तानातल्या 4 प्रांतातला सर्वात मोठा प्रांत.



पाकिस्तानचा तब्बल 44 टक्के भूभाग बलुचिस्तानने व्यापला आहे. खनिजं आणि नैसर्गिक साधन संपत्तीची श्रीमंती या भागात आहे. शिवाय इथलं लोकसंगीत... बलुचिस्तानला आणखी समृद्ध करतं... पण याच बलुचिस्तानचं महाराष्ट्र कनेक्शन मोठं रंजक आहे.

 

कडेकपाऱ्यात डोंगरदऱ्यात राहणाऱ्या या बलुची लोकांचं महाराष्ट्र कनेक्शन नक्की आहे तरी काय? इथं राहणाऱ्यांचे पूर्वज थेट महाराष्ट्रातून इथं का आले? असं नक्की काय झालं, की महाराष्ट्रातले मावळे इथलेच होऊन राहिले? याच प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्हाला आमच्यासोबत त्या रस्त्यावर प्रवास करावा लागेल... ज्या रस्त्यावर सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी 22 हजार मराठ्यांनी प्रवास केला होता.



पानिपतची लढाई एक भळभळती जखम

हरियाणातलं पानिपत आणि तिथं झालेली पानिपतची लढाई, ही मराठी योध्यांच्या काळजावरची भळभळती जखम.

*पानिपचं पहिलं युद्ध 1526 साली झालं. बाबरने इब्राहिम लोधीचा पराभव केला आणि मुघल साम्राज्याचा पाया रचला.

*पानिपतचं दुसरं युद्ध 1556 मध्ये झालं. या युद्धात अकबरने हेमूचा पराभव केला आणि अवघ्या भारतात मुघल साम्राज्याचा विस्तार झाला.

*आणि पानिपतचं तिसरं युद्ध झालं ते 1761 मध्ये. हे युद्ध होतं... मराठे विरुध्द अफगाण



पानिपतचं तिसरं युद्ध

दिल्लीतल्या मुघल साम्राज्याचा अस्त होत होता. इकडे नानासाहेब पेशव्यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार पंजाबपर्यत केला होता. मराठ्यांची हीच वाढती ताकद पानिपत युद्धासाठी कारणीभूत ठरली. मर्दानी मराठ्यांचा सामना करण्यासाठी मुघलांनी अफगाणी शासक अहमदशाह अब्दालीला युद्धात मदतीसाठी बोलावलं. आणि अशा प्रकारे 1761 साली अहमदशाह अब्दाली आणि मराठा सेनापती सदाशिवराव यांच्यात पानिपतचं तिसरं युद्ध सुरु झालं.

 

मराठा सैन्यानं कडवी झुंज दिली... पण या युद्धात अजिंक्य मराठ्यांना पराभवाचा सामना करावा लागला... आणि इथूनच खरी कहाणी सुरु होते... ती बुगती मराठ्यांची...



मराठा युद्धकैदी

पानिपतच्या युद्धातल्या विजयानंतर अहमदशाह अब्दालीनं तब्बल 22 हजार मराठा युद्ध कैद्यांना आपल्यासोबत अफगाणिस्तानला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.

इतिहासकार सियार उल मुत्ताखिरीन यांच्या मते,

युद्धानंतर मराठी युद्धकैद्यांच्या लांबचलांब रांगा केल्या, आणि त्यांना अफगाणी सैन्यासोबत दिल्ली, मथुरा या शहरांमध्ये पाठवण्यात आलं. युद्धानंतर जे मराठे वाचले... त्यातल्या पुरुष, महिला आणि मुलांना गुलाम बनवण्यात आलं.



अब्दालीसोबत 22 हजार युद्धकैदी

पानिपतच्या युद्धाच्या 2 महिन्यांनंतर म्हणजेच 20 मार्च 1761 रोजी अहमदशाह अब्दालीनं दिल्लीहून अफगाणिस्तानच्या दिशेने कूच केली. सोबत होते 22 हजार युद्धकैदी. पण अब्दालीचा ताफा जेव्हा पंजाबमध्ये पोहोचला, तेव्हा काही शीख लढवय्यांनी युद्धकैदेत असलेल्या अनेक महिलांची सुटका केली.

 

मराठा युद्धकैदी बलुची शासकाला भेट

पाकिस्तानातला पंजाब प्रांत पार केल्यानंतर बलुचिस्तानातलं डेरा बुगती हे क्षेत्र सुरु होतं. याच ठिकाणी अहमदशाह अब्दाली युद्धकैद्यांसोबत पोहोचला. पानिपतच्या युद्धामध्ये बलुची शासकाचे काही सैनिक अब्दालीच्या बाजूनं लढले होते. त्यामुळे अब्दालीला त्या मदतीच्या मोबदला द्यायचा होता. अब्दालीनं सारे मराठी युद्धकैदी बलुचिस्तानच्या शासकाला भेटस्वरुपात दिली.जे अखेरपर्यंत तिथेच राहिले.

 

मराठा युद्धकैद्यांना बलुचिस्तानमध्येच सोडण्याचं आणखी एक कारण होतं. बऱ्याच मोठ्या प्रवासामुळे मराठा युद्धकैदी अशक्त झाले होते... त्यामुळे अशा युद्धकैद्यांचं काय करायचं? असा प्रश्न अब्दालीला पडला होता...आणि म्हणूनच पिच्छा सोडवण्यासाठी अब्दालीनं युद्धकैद्यांना बलुचिस्तानातच सोडलं.

 

मराठा युद्ध कैद्यांची वर्गवारी

मीर नासीर खान नूरीने तब्बल 22 हजार मराठा युद्ध कैद्यांची वर्गवारी केली. त्यानं सैनिकांची वेगवेगळ्या जमातींमध्ये विभागणी केली. त्यात बुगती, मर्री, गुरचानी, मझारी आणि रायसानी कबिल्यांचा समावेश होता.  विशेष म्हणजे वेगवेगळ्या बलुची जमातींमध्ये आजही मराठा उपजमात कायम आहे.



आजही राहणीमानात मराठी संस्कृतीची छाप

मराठी युद्धकैद्यांचे वंशज आज मुस्लिम झाले आहे. पण आजही त्यांच्या राहाणीमानामध्ये मराठी संस्कृतीची छाप दिसते. सर्वाधिक मराठा वंशज हे बुगती जमातीमध्ये आहेत. 1960 च्या दशकात ब्रिटिश लेखिका सिल्विया मॅथेसन यांनी लिहिलेल्या टायगर्स ऑफ बलुचिस्तान या पुस्तकात बुगती मराठा समाजाचा उल्लेख आवर्जून करण्यात आला आहे.

 

मराठा मरता नही, मारता है

90 च्या दशकामध्ये आलेली तिरंगा ही फिल्म बलुचिस्तानात खूप गाजली... या फिल्ममध्ये नाना पाटेकरनं पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका साकारली होती. त्यात 'मै मराठा हूँ.... और मराठा मरता नहीं....मराठा मारता है, असा डायलॉग नाना पाटेकरांनी उच्चारताच थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्यांचा पाऊस पडायचा..

 

इतकंच नाही... तर बलुचिस्तानमधला बुगती मराठा आजही द ग्रेट मराठा ही हिंदी सीरियल इंटरनेटवरून डाऊनलोड करून त्याची पारायणे करतो...

 

पाण्याची जागा शोधून शेती

पण या लढवय्या मराठ्यांचा सुरुवातीचा काळ कठीण होता... जिथं त्यांना सोडण्यात आलं... त्या भागात ना शेती होती... ना पाणी... अखेर पाण्याची जागा शोधून मराठ्यांनी शेती करणं सुरु केलं... आणि त्यानंतर कुठे आयुष्य नव्याने सुरु झालं.

 

बलुचिस्तानमधल्या मराठी अंशाचे पुरावे त्यांच्या जातीतल्या उपनामावरूनही दिसून येतात. इथं छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू शाहू यांचं नाव बुगती मराठ्यांच्या उपजातीला देण्यात आलं..... इतकंच नाही... तर पेशव्यांशी जवळीक साधणारं पेशवानी हे नावही बलुची मराठ्यांमध्ये प्रचलित आहे.

 

लग्नातील मराठी परंपरा

शाहू मराठ्यांनी भलेही इस्लामचा स्वीकार केला असला, तरी त्यांच्या लग्नांमध्ये मराठी संस्कृती सहज दिसते. आपल्याकडे जशी हळद लागते, हळदीनंतर स्नान होतं, माप ओलांडणे आणि गाठ बांधणे... या साऱ्या प्रथा बुगती मराठ्यांच्या लग्नांमध्ये होतात.

 

आईकला, संस्कृती आणि चालीरितींमध्येच नाही, तर बलुचींची भाषाही मराठी भाषेशी नातं सांगते. शाहू मराठा जमातीमध्ये मातेसाठी मराठमोळा आई हाच शब्द वापरला जातो... या शब्दाला मूळ बुगती समाजानंही स्वीकारलंय... कमोल, गोदी अशी मराठी नावंही इथल्या महिलांची आहे.

 

बलुचिस्तानची हाक ऐकणार का?

पाकिस्तान हा नेहमीच बलुचिस्तानाला आपला प्रांत असल्याचा दावा करतो... पण बलुचिस्तान मात्र स्वतःला पाकिस्तानचा भाग समजत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तान हा बलुचिस्तानवर अन्याय अत्याचार करत आलाय... याच अत्याचारापासून मुक्त होण्यासाठी बलुचिस्ताननं आता भारताकडे मदतीचा हात पसरलाय... त्यामुळे महाराष्ट्राशी आणि पर्यायानं देशाशी नाळ जोडलेल्या बुगती मराठ्यांची ही हाक देश ऐकणार का तेच पहायचंय.