मुंबई : 1993 च्या मुंबई साखळी स्फोटांचा मास्टरमाईंड आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. खरंतर यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. पण दाऊदचा एक विश्वासू हस्तक त्याला तब्बल 40 कोटींचा चुना लावून पसार झाला आहे. आता दाऊद त्याच्या शोधात आहे.


खलीक अहमद असं या हस्तकाचं नाव आहे. खलीकने दाऊदची थोडीथोडकी नाही तर तब्बल 40 कोटींची फसवणूक केली आहे. भारतात पसरलेले दाऊदचे काळे धंदे खलीक सांभाळायचा. खलीक अहमद दाऊदच्या विश्वासातील माणूस होता.

गुप्तचर विभागाच्या अहवालानुसार, खलीक अहमदने मागील वर्षी दिल्लीच्या एका व्यापाऱ्याकडून 45 कोटींची वसुली केली होती. वसुलीचे पैसे दाऊदला पाठवायचे होते. यानंतर खलीकने 40 कोटी रुपये हवालामार्फत दाऊदला पाठवण्याचं नाटक केलं. त्याचसोबत 5 कोटी रुपये बक्षीस म्हणून स्वत:कडे ठेवले.

खलीक-जबीरच्या संभाषणातून फसवणुकीचा खुलासा

मात्र त्यानंतर 40 कोटी आणि खलीक दोघेही बेपत्ता झाले. दाऊदचा आणखी एक हस्तक जबीर मोटी आणि खलीकचा फोन टॅप केला होता. त्यानंतर गुप्तचर यंत्रणांना ही बाब समजली. हे दोघे नेहमची भारत आणि शारजाहमध्ये ये-जा करत असतात. जबीर मोटी पाकिस्तानमधील दाऊदचा खास माणूस आहे. तोही दाऊदसाठी अवैध वसुलीचं काम करतो.

दाऊदचं नाव खराब

मोटीने फोनवर खलीक अहमदला पैशांच्या अफरातफरीबाबत विचारलं.  दाऊदचा विश्वासू रज्जाकनेच दाऊदला या फसवणुकीबाबत सांगितलं. रज्जाकनुसार, "खलीकने बडे हजरतच्या (दाऊद) नावाने पैसे घेतले. खलीकच्या या कृत्यामुळे अंडरवर्ल्ड जगतात दाऊदचं नाव खराब झालं आहे."

खलीक आणि पैसे गायब

मात्र खलीकने फसवणुकीचा इन्कार केला आहे. चुकीच्या ट्रॅन्झॅक्शनमुळे दाऊदकडे पैसे पोहोचले नसावेत. लवकरच 40 कोटी डॉनकडे पोहोचतील, असा विश्वास त्याने जबीरला दिला. मात्र त्यानंतर खलीक आणि पैसे दोन्ही गायब आहेत. खलीक अहमद सध्या मणिपूरजवळ असल्याचं कळतं.