Israeli attacks on Gaza : येत्या रविवारपासून सुरू होत असलेल्या शस्त्रसंधीची घोषणा करूनही गाझावर इस्रायलचा नरसंहार सुरुच असून 21 मुले आणि 25 महिलांसह किमान 87 पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. पॅलेस्टिनी निर्वासितांसाठी काम करणाऱ्या यूएन एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार गाझामधील अंदाजे 15 मुले दररोज लढाईत जखमी होत आहेत. 7 ऑक्टोबर 2023 पासून गाझामध्ये इस्रायलच्या युद्धात किमान 46,788 पॅलेस्टिनी मारले गेले आणि 110,453 जखमी झाले आहेत. त्याच दिवशी हमासच्या हल्ल्यांमध्ये इस्रायलमध्ये किमान 1,139 लोक मारले गेले आणि 200 हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले. 


इस्रायल आणि हमासमध्ये युद्धविराम करार


दरम्यान, इस्रायल आणि हमासमध्ये युद्धविराम करार झाला आहे. इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने याला दुजोरा दिला आहे. या कराराबाबत आज सुरक्षा मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्याला सरकार शनिवारी मान्यता देणार आहे. त्यानंतर 19 जानेवारीपासून युद्धबंदी लागू होईल. तत्पूर्वी, गुरुवारी या कराराला मंजुरी देण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक होणार होती, पण पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासच्या मागण्यांबाबत बैठक रद्द केली. हमास शेवटच्या क्षणी कराराच्या अटींना नकार देत असल्याचा आरोप नेतान्याहू यांनी केला होता. इस्रायल टाइम्सच्या वृत्तानुसार, हमासने पॅलेस्टिनी कैद्यांच्या ओळखीशी संबंधित मुद्दा उपस्थित केला होता, जो नंतर मध्यस्थांच्या मदतीने सोडवण्यात आला. बुधवारी कतारच्या पंतप्रधानांनी हा करार अंतिम असल्याची पुष्टी केली होती.


हा करार 3 टप्प्यात पूर्ण होईल. पहिल्या टप्प्यात 33 इस्रायली ओलीसांची सुटका करण्यात येणार आहे. त्या बदल्यात इस्रायल 250 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करेल. इस्त्रायली सैन्यही गाझामधून माघार घेणार आहे.


इस्रायलच्या सुरक्षा मंत्र्यांनी या कराराला विरोध केला


इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री आणि उजव्या विचारसरणीचे नेते बेन-गवीर इटामार हे हमाससोबतच्या युद्धविराम कराराच्या विरोधात उतरले आहेत. गुरुवारी संध्याकाळी बेन-गवीर यांनी करार मंजूर झाल्यास सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची धमकी दिली. इस्रायल टाईम्सच्या वृत्तानुसार, हमाससोबत झालेल्या कराराला त्यांनी मोठा निष्काळजीपणा असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की त्यांचा ओत्झ्मा येहुदित पक्ष नेतान्याहू यांच्या लिकुड पक्षासोबतची युती तोडेल. असे झाल्यास, बेन गवीर यांनी पुन्हा सरकारमध्ये सामील होण्यासाठी गाझामधील युद्ध पुन्हा सुरू करण्याची अटही ठेवली आहे.


कराराची अंमलबजावणी कशी होणार?


करारानुसार, युद्धबंदीचा पहिला टप्पा 42 दिवसांचा असेल. पहिल्या टप्प्यात हमास 33 इस्रायली ओलीसांची सुटका करणार आहे. त्या बदल्यात इस्त्रायल हमासच्या 250 कैद्यांचीही सुटका करणार आहे. तसेच, इस्रायली सैन्य गाझा सीमेपासून 700 मीटर मागे हटणार आहे.
कतारची राजधानी दोहा येथे गेल्या अनेक आठवड्यांपासून युद्धबंदीसाठी वाटाघाटी सुरू होत्या. या संभाषणात इजिप्त आणि अमेरिकाही सामील होते. अल जझीराच्या रिपोर्टनुसार, कतारचेर राजे थानी यांनी बुधवारी हमास आणि इस्रायलच्या प्रतिनिधींची भेट घेतली, त्यानंतर हा करार पूर्ण झाला. ओलिसांच्या पहिल्या टप्प्याच्या सुटकेनंतर 15 दिवसांनी हमास उर्वरित ओलिसांची सुटका करेल. दरम्यान, दोन्ही बाजू कायमस्वरूपी युद्धबंदीबाबत बोलतील.


इतर महत्वाच्या बातम्या