बीजिंग : चीनचा मध्य प्रांत असलेल्या हेनानमध्ये गेल्या अनेक वर्षातील सर्वाधिक पाऊस झाल्याचं सांगण्यात येतंय. चीनमध्ये झालेल्या या रेकॉर्ड ब्रेक पावसामुळे कमीत कमी 25 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. हेनानची राजधानी असलेल्या झेंगझोऊ या शहरात एका मेट्रो लाईनमध्ये पाणी भरल्याने 12 जणांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी लष्कराला पाचारण करण्यात आलं असून आतापर्यंत दीड लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
चीनमध्ये आलेल्या पुरामुळे अनेक सबवे पाण्याखाली गेले आहेत. त्याचा परिणाम रेल्वे सेवेवर झाला असून मध्य प्रांतातील 160 हून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या पुराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये अनेक गाड्या पुराच्या पाण्यात वाहून जाताना दिसत आहेत. आतापर्यंत या पुरामध्ये साडेबारा लाख लोक प्रभावित झाल्याचं सांगण्यात येतंय.
हॉंगकॉंगच्या साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट ने दिलेल्या वृत्तानुसार, अनेक ठिकाणी पावसाचे पाणी भरल्याने शहरांतील वाहतूक सेवा बंद पडली आहे. 80 हून अधिक बस सेवा निलंबित करण्यात आल्या असून 100 हून अधिक बस सेवांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. शहरातील सबवे तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत. झेंगझोऊ या विमानतळावरुन 260 हून अधिक विमान सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. या पुरामुळे मध्य प्रांतातील वीज आणि पाणी पुरवठा सेवेवर परिणाम झाला असून त्या तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :