Singapore Woman Death Penalty : सिंगापूरमध्ये (Singapore) तब्बल दोन दशकांनंतर एका महिलेला फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. सिंगापूरमध्ये शुक्रवारी, 28 जुलै रोजी दोन आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. हे दोन्ही आरोपी अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात दोषी आढळले होते. या दोन आरोपींमधील एक महिला आहे. विशेष म्हणजे सिंगापूरमध्ये 20 वर्षानंतर महिलेला फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. सिंगापूरमधील मानवाधिकार संस्थेने यासंदर्भात माहिती दिली आहे.
सिंगापूरमध्ये महिलेली दिली जाणार फाशी
ट्रान्सफॉर्मेटिव्ह जस्टिस कलेक्टिव्ह (TJC) च्या स्थानिक अधिकार संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, 50 ग्रॅम हेरॉइनच्या तस्करीप्रकरणी दोषी आढळलेल्या 56 वर्षीय व्यक्तीला बुधवारी (26 जुलै) फाशी देण्यात येणार आहे. त्याला आग्नेय आशियाई शहर-राज्यातील चांगी तुरुंगात फाशी देण्यात येणार आहे.
शुक्रवारी दिली जाईल फाशी
यासोबतच, अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी (Drugs) दोषी ठरलेल्या 45 वर्षीय महिलेला शुक्रवारी (28 जुलै) फाशी देण्यात येणार आहे. ट्रान्सफॉर्मेटिव्ह जस्टिस कलेक्टिव्हनुसार, दोषी महिलेचे नाव सारीदेवी जमानी असं आहे. सुमारे 30 ग्रॅम हेरॉइनची तस्करी केल्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर तिला 2018 मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
20 वर्षांनी महिलेला फाशी दिली जाईल
स्थानिक अधिकार कार्यकर्त्या कोकिला अन्नामलाई यांनी सांगितलं की, या महिलेला फाशी झाल्यास 2004 नंतर सिंगापूरमध्ये फाशी देण्यात आलेली ती पहिली महिला असेल. यापूर्वी एका 36 वर्षीय महिलेला अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी फाशी देण्यात आली होती. टीजेसीच्या म्हणण्यानुसार, दोन्ही कैदी सिंगापूरचे असून त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या फाशीच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत.
भारतीय व्यक्तीला एप्रिलमध्ये फाशी देण्यात आली होती
यापूर्वी 26 एप्रिल रोजी सिंगापूरमध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी भारतीय वंशाच्या एका व्यक्तीला फाशी देण्यात आली होती. त्याच्या कुटुंबीयांनी फाशी होऊ नये यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती, ती फेटाळण्यात आली.
सिंगापूरमध्ये अंमली पदार्थाविरोधात कठोर कायदा
सिंगापूरमध्ये जगातील सर्वात कडक अंमली पदार्थ विरोधी कायदा आहे. सिंगापूरमधअये अंमली पदार्थांची तस्करी करताना पकडल्यास संबंधित व्यक्तीला फाशीची शिक्षा देण्याची तरतूद आहे. सिंगापूरमध्ये 500 ग्रॅमपेक्षा जास्त गांजा किंवा 15 ग्रॅमपेक्षा जास्त हेरॉइनची तस्करी करताना आढळल्यास मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :