Kabul Blast: अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील मशिदीत बॉम्बस्फोट झाल्याची बातमीसमोर येत आहे. या स्फोटात 21 ज्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 60 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, खैर खाना परिसरातील मशिदीत लोक नमाज पठण करत असताना स्फोट झाला. स्फोटाची माहिती देताना काबूल सुरक्षा विभागाचे प्रवक्ते खालिद जद्रान यांनी सांगितले की, काबूलच्या पीडी 17 येथील मशिदीत बॉम्बस्फोट झाला. ते म्हणाले की, सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले असून सर्व जखमींना रुग्णालयात नेण्यात येत आहे. या स्फोटात मशिदीचे मौलवी अमीर मोहम्मद काबुली यांचाही मृत्यू झाला आहे.


या घटनेदरम्यान काबूलमधील एका रुग्णालयाने असे ट्वीट केले आहे की, बॉम्बस्फोटोत जखमी झालेल्या एकूण 27 जणांना त्यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, पीडी 17 भागात झालेल्या स्फोटानंतर आतापर्यंत 27 जणांना आमच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये 7 वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. 






आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र गेल्या अनेक महिन्यांत असे अनेक हल्ले झाले आहेत, ज्यामध्ये मशिदींना लक्ष्य करण्यात आले. पण या हल्ल्यात एक नवीन गोष्टही समोर आली आहे. आतापर्यंत शिया मशिदींना आईएस या दहशतवादी संघटनेकडून लक्ष्य केले जात होते. पण आज ज्या भागात हा स्फोट झाला त्या भागात शिया लोकसंख्या नाही.


दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबानचे सरकार आहे. अलीकडेच तेथे तालिबान सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. अश्रफ घनी यांचे सरकार सत्तेवरून हटवल्यानंतर तालिबानने तेथे ताबा मिळवला. गेल्या काही महिन्यांत तालिबानमध्ये बॉम्बस्फोटाच्या अनेक घटना घडल्या आहेत. यापूर्वी काबूलमधील एका मशिदीत स्फोट झाला होता, ज्यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला होता. यापूर्वी अफगाणिस्तानातील गुरुद्वारांनाही लक्ष्य करण्यात आले होते.


इतर महत्वाच्या बातम्या:


Monkeypox Outbreak : मंकीपॉक्सचा धोका वाढतोय, 92 देशात 35 हजारांपेक्षा जास्त रुग्ण, 12 जणांचा मृत्यू
मॅंचेस्टर युनायटेड विकत घेणार नाही, तो फक्त एक जोक होता; इलॉन मस्क यांच्या स्पष्टीकरणानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया