Afghanistan Crisis: अफगाणिस्तानमध्ये तालिबानने ताबा घेतल्यानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोक आपला जीव वाचवण्यासाठी देश सोडण्यासाठी धावपळ करत आहेत. अफगाणिस्तानमध्ये सध्या तिथे राहणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, एक फोटो व्हायरल होत आहे ज्यात अमेरिकन टेलिव्हिजन पत्रकार क्लेरिसा वार्ड दोन वेगवेगळ्या ड्रेसमध्ये रिपोर्टिंग करताना दिसत आहे. सोशल मीडियावरील काही पोस्टमध्ये असे म्हटले जात आहे की तालिबानने अफगाणिस्तानवर पूर्ण ताबा मिळवल्यानंतर क्लेरिसाच्या ड्रेसमध्ये हा बदल पहायला मिळत आहे.
लोकांमध्ये सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असलेल्या छायाचित्रांदरम्यान स्वतः क्लेरिसा वार्डने तिचे स्पष्टीकरण दिले आहे. ती म्हणाली की, व्हायरल फोटो चुकीच्या पद्धतीने पसरवण्यात येत आहे. या मीममधील वरचा फोटो हा खाजगी परीसरातील आहे तर खालील फोटो काबूल येथील तालिबानच्या रस्त्यावर रिपोर्टींग करताना घेतलेला आहे.
ती पुढे म्हणाली की, काबूलच्या रस्त्यांवर रिपोर्टिंग करताना मी यापूर्वीही माझ्या डोक्यावर स्कार्फ ठेवला आहे. केस पूर्णपणे झाकलेले नाही. अशा स्थितीत जरी ड्रेसमध्ये बदल झाला असला तरी तो व्हायरल चित्रात दाखवल्याप्रमाणे नाही.
अमेरिकन पत्रकार क्लेरिसा वार्ड एका फोटोमध्ये पाश्चात्य व्यावसायिक ड्रेसमध्ये दिसत आहेत, तर दुसऱ्या फोटोमध्ये ती इस्लामिक ड्रेसमध्ये दिसत आहे, जे केवळ मुस्लिम महिला परिधान करतात. अशा परिस्थितीत, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये असे म्हटले जात आहे की क्लेरिसाने हे जाणूनबुजून भीतीपोटी केले आहे.
तालिबानचा कमांडर मुल्ला अब्दुल गनी बरादार बनणार राष्ट्राध्यक्ष
अफगाणिस्तानवर आता तालिबानने संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित केलं असून राष्ट्रपती अशरफ घनी हे देश सोडून गेले आहेत. राष्ट्रपती अशरफ घनी यांनी आता अफगाणिस्तानच्या सत्तेवर पाणी सोडलं असून त्याचे हस्तांतरण करण्याची तयारी ठेवली आहे. तालिबानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानमध्ये अंतरिम सरकार स्थापन होत असून तालिबानचा कमांडर मुल्ला अब्दुल गनी बरादार हा राष्ट्राध्यक्ष असेल अशी माहिती आहे.
काबुलमधील राष्ट्रपती भवनच्या परिसरातून अफगाणिस्तानला इस्लामी अमिरात बनवल्याची घोषणा करण्यात येणार असून तालिबानच्या या अंतरिम सरकारला चीनने समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानही तशा प्रकारचा अधिकृत निर्णय लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती आहे. अमेरिका आणि नाटोचे सैन्य अफगाणिस्तानमधून माघारी गेल्यानंतर काहीच अवधीत तालिबानी दहशतवादी संघटनेनं या देशावर कब्जा मिळवला आहे.