Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानच्या कु्नर प्रांतात रविवारी उशिरा झालेल्या जोरदार भूकंपामुळे प्रचंड हानी झाली असून, प्राथमिक माहितीनुसार 250 लोकांचा मृत्यू, तर 500 हून अधिक जण जखमी झाले आहेत. भूकंपाची तीव्रता 6.0 रिश्टर स्केल होती. अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण विभागानुसार, भूकंपाचे केंद्र नंगरहार प्रांतातील जलालाबाद शहराजवळ होते आणि त्याची खोली केवळ 8 किमी इतकी होती. भूकंप स्थानिक वेळेनुसार रविवारी रात्री 11:47 वाजता झाला. या भूकंपाचे धक्के पाकिस्तानपर्यंत जाणवल्याची माहिती समोर येत आहे.
250 जण दगावले, 500 जखमी
सुरुवातीला मृतांचा आकडा कमी असल्याचे सांगितले जात होते, पण Anadolu एजन्सीने अफगाणिस्तानच्या माहिती मंत्रालयाच्या हवाल्याने सांगितले की, 250 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 500 पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. कुनर प्रांताला सर्वाधिक फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, भूकंपानंतर 20 मिनिटांनी दुसऱ्या धक्क्याची नोंद झाली असून, त्याची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल आणि खोली 10 किमी इतकी होती. सध्या अफगाणिस्तानातील भूकंपग्रस्त भागांमध्ये अन्न, औषधे, निवारा आणि वैद्यकीय सेवांची तातडीने गरज आहे. मदत संघटनांनी आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने त्वरीत मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मैदान शहरच्या माजी महापौर झरिफा घफ्फारी यांनी सोशल मीडियावर म्हटले की, “कुनर, नंगरहार आणि नुरिस्तान प्रांतांमध्ये संपूर्ण गावे जमीनदोस्त झाली आहेत. महिला, मुले, आणि वृद्ध यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. तालिबान सरकारकडून योग्य मदत मिळत नसल्याने आंतरराष्ट्रीय समुदायाने त्वरित मदतीसाठी पुढे यावे.”
अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू रहमानुल्ला गुरबाज यांनी मृतांचे खूप दुःख व्यक्त केले. "अफगाणिस्तानातील कुनार येथे झालेल्या दुःखद भूकंपामुळे मला खूप दुःख झाले आहे. माझ्या प्रार्थना पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत," असे त्यांनी म्हटले आहे.
याआधी 7 ऑक्टोबर 2023 रोजी आलेल्या भूकंपातही मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. त्यात तालिबान सरकारनुसार 4,000 लोकांचा मृत्यू, तर संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार सुमारे 1,500 मृत्यू झाले होते.
आणखी वाचा