काबुल : भारतीय दुतावासाजवळ काबुलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर अफगाणिस्तानने पाकिस्तानसोबतचे क्रिकेट संबंध तोडले आहेत. बॉम्बस्फोटामध्ये पाकिस्तानचा हात असल्याचं अफगाणिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांनी सांगितलं होतं. त्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तान संघ या वर्षाअखेरपर्यंत अफगाणिस्तानमध्ये पहिला ट्वेंटी ट्वेंटी सामना खेळणार होता. काबुलमध्ये जुलै किंवा ऑगस्टमध्ये एक सामना होणार होता. शिवाय एका मालिकेचंही नियोजन होतं. मात्र काबुलमधील बॉम्बस्फोटानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने सर्व सामने रद्द केले आहेत.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच एसीबी पाकिस्तानसोबतचे सर्व प्रस्तावित सामने रद्द करत आहे. शिवाय क्रिकेट संबंध तोडत असल्याचं एसीबीने फेसबूक पेजवर म्हटलं आहे.

दरम्यान पीसीबी म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एसीबीवर तोफ डागली आहे. हल्ल्यातील पीडितांविषयी आमची सहानुभूती आहे. मात्र एसीबीने घेतलेला हा निर्णय निरार्थक आहे. या निर्णयाचा निषेध करतो, असं पीसीबीने म्हटलं आहे.

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये भारतीय दुतावासाजवळ मोठा बॉम्बस्फोट झाला. ज्यामध्ये जवळपास 90 जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो जण जखमी झाला आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. मात्र अफगाणिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांनी पाकिस्तानकडे बोट केलं आहे.