काबुल : अफगाणिस्तानमधील (Afghanistan Blast) हेरात प्रांतामध्ये एका मशिदीच्या (Guzargah Mosque) बाहेर शुक्रवारच्या नमाजाच्या दिवशी स्फोट घडला असून त्यामध्ये 20 जणांचा मृत्य झाल्याचं समोर आलं आहे. या स्फोटामध्ये 200 जण जखमी झाल्याची माहिती आहे. या मशिदीच्या इमामाचा या स्फोटामध्ये मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय. मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम अफगाणिस्तानमधील हेरातमधील (Herat in western Afghanistan) मशिदीच्या बाहेर आज मोठा बॉंबस्फोट झाला. यामध्ये तालिबानचे समर्थक असलेल्या हाय प्रोफाईल इमाम तसेच नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तालिबानच्या (Taliban) अधिकाऱ्यांनीही या स्फोटाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. या स्फोटामध्ये मशिदीचा इमाम मुजिबुर रहमान अन्सारी (Mujib Rahman Ansari) याचा मृत्यू झाला आहे.
शुक्रवारच्या नमाजाच्या दिवशी या मशिदीमध्ये (Guzargah Mosque) मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. या दरम्यान मशिदीत आत्मघातकी हल्ल्याच्या माध्यमातून हा स्फोट घडवण्यात आला. त्यामुळे मृतांच्या संख्येत अजून वाढ होण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी अमेरिकेने अफगाणिस्तानमधून त्यांचे सैन्य माघार घेतले. अमेरिकेच्या या निर्णयानंतर त्या ठिकाणी लोकशाही सरकार उलथवून तालिबानने सत्ता काबिज केली.
हेरातमधील गुजरगाह मशिदीचा इमाम मुजिबुर रहमान अन्सारी हा तालिबान राजवटीचा कट्टर समर्थक होता. तालिबान राजवटीला समर्थन देण्यासाठी त्याने हजारो नागरिकांचा मेळावा घेतला होता. तालिबानच्या विरोधात बोलणाऱ्यांवर तो चांगलीच टीका करायचा.
गेल्या महिन्याभरात मृत पावलेला मुजिबुर रहमान अन्सारी हा दुसरा तालिबान समर्थक इमाम आहे. त्या त्या आधी काबुलमधील एका मदरशावर करण्यात आलेल्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये तालिबानचा समर्थक रहिमतुल्ला हक्कानी याचा मृत्यू झाला होता. हक्कानी हा आयएसआयएस (ISIS) च्या विरोधात गरळ ओकायचा. आयएसआयएसच्या विरोधात आपल्या भाषणातून त्याने अनेकदा टीका केली होती.