काबुल: अफगाणिस्तानमध्ये युक्रेनचे विमान अपहरण करण्यात आले आहे. युक्रेनच्या उप परराष्ट्रमंत्र्यांनी विमान अपहरण झाल्याचा दावा केला आहे. असा दावा केला जातो की युक्रेनचे विमान अफगाणिस्तानातून आपल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आले होते. विमान अपहरणानंतर इराणला नेण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
युक्रेनच्या उप परराष्ट्रमंत्र्यांच्या मते, युक्रेनच्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युक्रेनचे एक विमान रविवारी काबूलला पोहोचले होते. यानंतर काही सशस्त्र लोकांनी ते ताब्यात घेऊन इराणला नेले. विमानाची चोरी झाल्याचे युक्रेनचे उप परराष्ट्र मंत्री म्हणाले आहेत.
या घटनेनंतर विमानातील लोकांचे काय झालं याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. युक्रेनच्या उप परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे की विमानाचे अपहरण झाल्यामुळे बचाव आणि मदत कार्यात अडथळा आणला आहे.
या घटनेवरून काबूलच्या विमानतळावर कोणत्या प्रकारची अराजकता आहे याचा अंदाज बांधता येतो. एका विमानाचे अपहरण झाल्याची बातमी आहे. त्याचबरोबर या प्रकरणावर इराणच्या प्रतिक्रियेचीही प्रतीक्षा केली जात आहे. हे युक्रेनचे विमान इराणच्या दिशेने गेले आहे की नाही याबद्दल माहिती गोळा केली जात आहे.
काबूल विमानतळाची सुरक्षा सध्या अमेरिकन लष्कराच्या हातात आहे. त्यामुळे एवढी कडक देखरेख असूनही अपहरणकर्ते विमानतळाच्या आत कसे घुसले असा प्रश्नही उपस्थित होत आहे. प्रथम या अपहरणाची बातमी रशियन माध्यमांमधून बाहेर आली.
अफगाणिस्तानमध्ये भयानक परिस्थिती
अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी सत्ता मिळवल्यानंतर तेथील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. 20 वर्षांपूर्वीची भीतीची परिस्थिती पुन्हा तिथं दिसू लागली आहे. तालिबान्यांच्या दहशतीमुळे अनेकांवर देश सोडून जाण्याची वेळ आली आहे. दरम्यान, अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना आपल्या देशात आणण्याचे मिशन सुरु आहे. सूत्रांचं म्हणणे आहे की, 15 ऑगस्टपूर्वीच ऑपरेशन एअरलिफ्टची तयारी सुरु झाली होती. 15 ऑगस्ट रोजी काबूलमधील भारतीय दूतावासापासून सुमारे 70 मीटर अंतरावर स्फोटाचा आवाज ऐकू आला, त्यानंतर अफगाणिस्तानातील भारतीयांच्या सुरक्षेविषयीची चिंता वाढली होती.