जकार्ता : प्रेमाला वयाचं बंधन नसतं. त्यामुळेच की काय एका 15 वर्षाच्या मुलाने 73 वर्षांच्या महिलेसोबत प्रेमविवाह केला. मुलगा अल्पवयीन असल्याने या जोडप्याला लग्न करण्यास परवानगी दिली जात नव्हती. पण लग्नात अडथळा आल्याने दोघांनी आत्महत्या करण्याची धमकी दिली.


हे प्रकरण इंडोनेशियातील आहे. 15 वर्षांच्या सेलामत रियादीला मलेरिया झाला होता. या दरम्यान त्याच्या शेजारी राहणाऱ्या रोहाया बिनती मोहम्मद जकफर या महिलेने त्याची शुश्रुषा केली होती. यानंतर दोघांमध्ये प्रेम फुललं.

इंडोनेशियामध्ये पुरुषांसाठी लग्नाची वयोमर्यादा 19 वर्ष आहे. पण तरीही सुमात्रा गावाच्या प्रशासनाने या दोघांच्या लग्नासाठी मंजुरी दिली आहे.

गावाचे प्रमुख सिक ऐनी यांनी सांगितलं की, "सेलामत लग्नासाठी अजून फारच लहान आहे. तरीही आम्ही लग्नासाठी परवानगी दिली, कारण दोघांनीही आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. मुलगा अजून अल्पवयीन असल्याने आम्ही त्यांचं लग्न धूमधडाक्यात केलं नाही."

इतकंच नाही सध्या तरी जोडप्याने शारिरीक संबंध ठेवू नये, असं काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.


सेलामतच्या वडिलांचं काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं. त्यानंतर आईने दुसरं लग्न केलं होतं. लग्नानंतर आई काळजी घेत नव्हती, असं सेलामतने सांगितलं.

तर दुसरीकडे नववधू रोहायाने यापूर्वी दोन लग्न झाली असून आणि तिला एक मुलगाही आहे.

इंडोनेशियाच्या सुदूर कारंग एंडाह गावात मागील आठवड्यात हे लग्न पार पडलं. पण इंटरनेटवर या जोडप्याच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशाचा या लग्नातील इंटरेस्ट वाढला.

मात्र इंडोनेशियाचे सामाजिक कल्याण मंत्र्यांनी मुलगा अल्पवयीन असल्याने ह्या लग्नावर टीका केली.