बेंगळुरु: झोमॅटो डिलिव्हरी बॉयवर मारहाणीचा आरोप करणाऱ्या हितेशा चंद्राणीने बेंगळुरु शहर सोडलं आहे.  एफआयआर दाखल केल्यानंतर पोलिसांनी हितेशाशी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांना कळाले की तिने शहर सोडलं आहे. 


एफआयआर दाखल केल्यानंतर पोलिसांनी हितेशा चंद्राणीची चौकशीसाठी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर होण्यासाठी तिला फोन केला तेव्हा आपण शहर सोडल्याचं तिने पोलिसांना सांगितलं. सध्या ती महाराष्ट्रात तिच्या नातेवाईकांच्या घरी गेली आहे. सोमवारी, झोमॅटो डिलिव्हरी बॉय कामराजने हितेशा चंद्राणी विरोधात पोलिसाकडे तक्रार दाखल केली होती. 


पोलिसांच्या मते, हितेशा परत आल्यानंतर तिने या प्रकरणावर आपला जबाब द्यावा, अन्यथा तिला अटक करावी लागेल. 


झोमॅटो डिलिव्हरी बॉयने केला हितेशावर मारहाणीचा आरोप
पोलीस अधिकारी म्हणाले की, झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या आरोपावर हितेशा चंद्राणी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिलिव्हरी बॉयने आपल्या तक्रारीत असं सांगितलं आहे की, हितेशानेच त्याला चपलांनी मारले होते आणि शिव्या देखील दिल्या होत्या.


झोमॅटोवरुन मागवलेले खाद्यपदार्थ डिलिव्हरी करण्यास वेळ का झाली असा जाब विचारल्यानंतर डिलिव्हरी बॉयने आपल्याला मारहाण करायला सुरुवात केल्याचा आरोप हितेशाने केला होता. दरम्यान, हितेशाने या प्रकरणी जो व्हिडीओ ट्विटरवरून शेअर केला होता तो आता काढून टाकला आहे.


काय आहे प्रकरण?


हितेशा चंद्रानी हिने  झोमॅटो कंपनीच्या कामराज या डिलिव्हरी बॉयवर मारहाण केल्याचा आरोप केला होता. त्यानुसार या प्रकरणात झोमॅटो कंपनी आणि कर्मचारी कामराजवर देशभरातून टीका केली गेली. नंतर कामराजने एका व्हिडीओच्या माध्यमातून आपल्याला कसं खोटं पाडलं जातंय आणि कसा बळीचा बकरा केला जातोय याची कथा मांडली होती.त्यानुसार आता मॉडेल आणि मेकअप कलाकार असणाऱ्या हितेशा चंद्रानीवर आयपीसी कलम 355, कलम 504 आणि कलम 506 असे अनुक्रमे हल्ला, अपमान आणि धमकी या गुन्ह्याखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बेंगळुरुच्या शहर पोलीस स्टेशनमध्ये कामराजने ही तक्रार दाखल केली आहे.



संबंधित बातम्या