मुंबई : राज्यात आणि देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक ठिकाणी लॉकडाऊनची प्रक्रिया सुरु झाली आहे. महाराष्ट्रत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे कडक निर्बंध लावले जातायेत त्याला मनसेकडून विरोध केला जातोय. महाराष्ट्रला लागून असलेल्या गोवा, कर्नाटक आणि गुजरात या राज्यात कोरोना नाही, फक्त महाराष्ट्रातच कोरोना कसा वाढतोय ? असा प्रश्न मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी विचारालाय.


राज्य सरकारकडून कोरोनाचा बाऊ केला जातोय, कोरोनाच्या नावाखाली लोकांना भीती दाखवली जाते असा आरोप मनसेकडून सातत्याने केला जातोय. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: मास्क वापरायच्या भूमिकेच्या विरोधात आहेत. त्यांनी वेळोवेळी आपल्या कृतीतून ते दाखवून दिलं आहे. 


तुमचे घाणेरडे प्रकरण बाहेर येतायेत म्हणून कोरोना वाढतोय का? महाराष्ट्राला लागून असलेल्या राज्यात कोरोना नाही, मग महाराष्ट्रातच तो कसा वाढतोय? सरकारचं कोरोनावर का कोरोनाचं सरकारवर प्रेम आहे ? असे सवाल मनसेने राज्य सरकारला विचारले आहेत. सरकार जर एवढे जर कडक निर्बंध लावत असेल तर जनतेला काही सवलती देणार का? असाही सवाल मनसेने राज्यातल्या महाविकास आघाडीला विचारला आहे.


"आपला प्रवास खडतर, पण गरुड भरारी घेण्याची शक्ती तुमच्या सदिच्छांमुळे", राज ठाकरेंची 'मन की बात'


कोरोना रुग्ण संख्या कमी होते तेंव्हा आदित्य ठाकरे यांचा 'वरळी पॅटर्न' आणि कोरोना रुग्ण वाढले की लोक बेजबाबदार अशी बोचरी टीका मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर केली आहे. जनतेने काम करायचे नाही का ? सरकारने कोरोनाच्या नावावर लोकांना फक्त घाबरवायच का?  असाही सवाल मनसेकडून केला गेलाय. 


वीज बिलाचे पैसे लोक कसे भरणार असा प्रश्न विचारत मनसेने लॉकडाऊन लावायचा तर मग वीज तोडणी बंद करा अशीही मागणी केली आहे. 


राज्यात गाजत असलेल्या सचिन वाझे प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, "ज्या पद्धतीने हे प्रकरण बाहेर आलंय, तेंव्हा मुंबई नाही तर महाराष्ट्र पोलिसांच्या विश्वासाहर्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. महाराष्ट्र सरकारच्या दबावाखाली पोलीस काम करत आहेत. सरकाराला प्रश्न विचारला की त्यांच्यावर पोलीस कारवाई करणार. पोलिसांची प्रतिमा राज्यासाठी महत्वाची आहे त्यासाठी त्यांनी काम केले आहे. या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू आहे, पूर्ण सत्य बाहेर येऊ द्यात."


Zomato डिलिव्हरी बॉयच्या तक्रारीवरुन मारहाणीचा आरोप करणाऱ्या महिलेविरोधात तक्रार