Shiv Sena MLA Disqualification Case : राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या राजकीय भवितव्यासाठी गुरुवारचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. 10 जानेवारी 2024, म्हणजेच गुरुवारी शिवसेना आमदार अपात्रता (MLA Disqualification Case) सुनावणीचा निर्णय जाहीर होत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर करणार आहेत. निकालाचं काऊंटडाऊन सुरू झालं असून केवळ आमदारांचीच नाही, तर संपूर्ण राज्याची धाकधूक वाढली आहे.


आज उद्धव ठाकरेंच्या बाजूच्या 14 आणि एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांच्या अपात्रतेवर पडदा उठणार आहे. यातच शिवसेना ठाकरे गटाचे जोगेश्वरी मतदारसंघाचे आमदार रवींद्र वायकर यांच्यावर देखील अपात्रतेची टांगती तलवार आहे. या निकालात ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर (Udaysingh Rajput) पात्र होणार की अपात्र? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.


ईडीकडून रवींद्र वायकर यांच्या कार्यालयावर छापे 


आमदार रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबासोबत रायगड जिल्ह्यात बेकायदेशीरपणे जमीन खरेदी केल्याचा आरोपी भाजपने केला होता. याप्रकरणात रवींद्र वायकर यांची चौकशीही झाली होती. दरम्यान मंगळवारी (दि.9)ईडीच्या अधिकाऱ्यांनी वायकरांच्या घरी आणि कार्यालयावर छापेमारी केली आहे. 


मुंबई महापालिकेत तब्बल 20 वर्षे नगरसेवक म्हणून काम 


रवींद्र वायकर 65 वर्षीय आहेत. शिवसैनिक ते राज्यमंत्रीपद असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. मुंबई महापालिकेत त्यांनी तब्बल 20 वर्षे नगरसेवक म्हणून त्यांनी काम केले आहे. 1992 मध्ये ते पहिल्यांदा जोगेश्वरी येथून नगरसेवक म्हणून निवडून आले. दरम्यान 2009, 2014 आणि 2019 मध्ये ते जोगेश्वरी मतदारसंघातून निवडून आले आहेत. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. 


उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी ते भ्रष्टाचाराचे आरोप 


आमदार रवींद्र वायकर उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. ते उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतले नेते मानले जातात. अभ्यासू आणि प्रशासकीय अनुभव यामुळेच त्यांची ठाकरेंबरोबर जवळीक वाढली. त्याच्यावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही अनेक गंभीर आरोप केले होते. उद्धव ठाकरे आणि रवींद्र वायकर यांच्याविरोधात किरीट सोमय्या यांनी तक्रार दाखल केली होती.  रेवदंडा पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली होती. ठाकरे कुटुंबिय आणि वायकर यांनी सत्तेचा गैरवापर करुन फसवणूक केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या 


MLA Disqualification Case: शिवसेनेचे मुख्यनेते, बंडाचे कर्तेधर्ते; 40 आमदारांसह गुवाहाटी गाठणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पात्र की अपात्र?