वाशिम : वाशिम (Washim) जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यामध्ये एरंडा गावातील कारली परिसरात असलेल्या शेतीवरुन वाद झाला. तर याच वादामुळे वाशिम जिल्ह्यात तीन दिवसांत दोघांची हत्या करण्यात आलीये.   गजानन सपाटे या 50 वर्षीय या शेतकऱ्याचं गावालगत असलेल्या शेतीवरुन अनेक वर्षांपासून वाद सुरु होता. पण काही केल्या हा वाद मिटतच नव्हता. पण बुधवारी हा वाद अगची विकोपाला गेला आणि त्यामध्ये गजानन यांचा मृत्यू झाला. तर शिक्षक दीपक सोनावणे यांची देखील जुन्या शेतीच्या वादातून हत्या करण्यात आली आहे. 


वाशिम जिल्ह्यात सुरु असलेल्या या घटनांमुळे प्रलंबित शेतीच्या वादाची प्रकरणं निकाली लागणं सध्या आवश्यक असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान पोलिसांकडून देखील दोन्ही प्रकरणातील आरोपींचा तात्काळ शोध सुरु करण्यात आला. तर गजानन सपाटे यांच्या प्रकणात पोलिसांनी ल 4 महिला आरोपींना अटक केलीये. तर इतर पाच आरोपींचा शोध सध्या पोलिस घेत आहेत. 


गजानन सपाटे यांच्या बाबतीत काय घडलं?


गजानन सपाटे यांच्या शेतीचा वाद मागील काही दिवसांपासून सुरु होता. पण बुधवार (11 ऑक्टोबर) रोजी हा वाद अगदीच विकोपाला गेला. रात्री 10 वाजताच्या सुमारास गजानन हे शेतातील सोयाबीन काढण्यासाठी गेले होते. सोयाबीनची काढणी झाल्यानंतर गावातील पारा जवळून जात असताना पाळत ठेवून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. नऊ लोकांनी गजानन यांच्या डोक्यात लोखंडी सळई घातली. त्यांच्यावर हल्ला झाल्याने जागीच त्यांची हत्या करण्यात आली. 


या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी त्या हत्येत वापरण्यात आलेलं साहित्य जप्त करण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी चार महिला आरोपींना ताब्यात घेतलं. तर इतर पाच आरोपींचा शोध सध्या पोलिसांकडून घेण्यात येत आहे. 


शिक्षक दीपक सोनावणे यांची हत्या कशी झाली?


तीन दिवसांत दोघांची हत्या झाल्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचं चित्र वाशिममध्ये आहे. तर शिक्षक दीपक सोनावणे यांच्या जुन्या शेतीच्या वादातून ही हत्या झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांना रस्त्यात अडवून त्यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला. तर जिवंत जाळण्याचा प्रयत्न यावेळी हल्लेखोरांकडून करण्यात आला. पण उपचारादरम्यान सोनावणे यांचा मृत्यू झाला. 


अवघ्या तीन दिवसात शेतीच्या वादातून दोन हत्या झालेल्या जिल्ह्यात एकच खळबळ माजली. तर पोलिसांकडून देखील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम सुरु आहे. दरम्यान आता पोलिसांकडून कोणती कठोर पावलं उचलली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


हेही वाचा : 


Crime News : पत्नीसोबत अनैतिक संबंधाचा संशय, पेट्रोल टाकून मित्राला जिवंत पेटवले; न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा