Muslim Girls Face Trouble at NEET Exam Center : वाशिम (Washim) येथे नीट परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ उडाला आहे. शांताबाई गोटे विद्यालयात नीट (NEET) परीक्षेदरम्यान गोंधळ झाल्याचं समोर आलं आहे. परीक्षेला बसताना हिजाब आणि बुरखा काढण्यासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप परीक्षार्थींच्या पालकांनी केला आहे. विद्यार्थ्यांनी या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.


परीक्षेसाठी बुरखा काढण्यास जबरदस्ती


वाशिमच्या  शांताबाई गोटे विद्यालयातील प्रकार समोर आला आहे. नीटचे परीक्षा देण्यासाठी आलेल्या मुस्लिम विद्यार्थिनींचा हिजाब आणि बुरखा काढल्याचा आरोप विद्यार्थी आणि पालकांनी केला आहे. परीक्षेवेळी विद्यार्थिनींचा हिजाब आणि बुरखा काढण्यास सांगितल्याने पालक चांगलेच संतप्त झाले.  


वाशिमच्या  शांताबाई गोटे विद्यालयातील प्रकार


शांताबाई गोटे विद्यालयात आज नीट (NEET) परीक्षा घेण्यात आली. हजारो विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. मात्र वाशिम येथील एका केंद्रावरील घडलेल्या प्रकाराबद्दल विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे की, मुस्लिम विद्यार्थिनींना नकाब आणि हिजाब काढण्यास सांगितलं असं कुटुंबीयांनी सांगितलं आहे.


परीक्षा केंद्रावर मुलींसोबत गैरवर्तन


पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत असे लिहिले आहे की, मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालयात NEET चा पेपर घेण्यात आला होता, अनेक विद्यार्थ्यांसह दोन मुस्लिम विद्यार्थिनीही परीक्षेसाठी गेल्या होत्या, पण त्यांच्यासोबत परीक्षा केंद्रातील प्रशासकीय अधिकारी आणि सदस्यांनी गैरवर्तन केलं. परीक्षेवेळी त्यांनी विद्यार्थीनींना म्हटलं की, 'बुरखा काढा, काढला नाहीस तर कात्रीने कापतो.'


परीक्षा केंद्रात शिक्षकाचं असं वर्तन अयोग्य - पीडिता


पीडित विद्यार्थिनीने सांगितले की, आधी परीक्षा कक्षात येण्यास मज्जाव करण्यात आला, नंतर हिजाब आणि बुरखा काढून टाका असे सांगून बाहेर पाठवण्यात आलं, बराच वादावादी झाल्यानंतर शेवटी रस्त्यावर बुरखा आणि हिजाब काढण्यात आला. परीक्षा केंद्रात शिक्षकाचं असं वर्तन योग्य नसल्याचेही पीडित विद्यार्थिनीनं म्हटलं आहे.