Washim News : '2024 मध्ये के. चंद्रशेखर राव यांचे सरकार आणूया' अशी घोषणा ओबीसी तथा बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod) यांनी केली आहे. त्यासाठी येणाऱ्या 29 आणि 30 मार्च रोजी राठोड यांनी बंजारा समाजाची (Banjara Community) काशी असलेल्या वाशिम (Washim) जिल्ह्यातील पोहरादेवी (Pohradevi) या ठिकाणी भारत राष्ट्र समितीच्या दोन मेळाव्याचे आयोजन केले आहे. मात्र, हरिभाऊ राठोड यांच्या या आयोजनावर पोहरादेवीच्या महंतांनी टीका केली आहे. रामनवमीच्या निमित्ताने येणारी गर्दी पाहून मेळावा घेण्यात आला आहे. परंतु आयत्या गर्दीचा फारसा परिणाम होत नसतो असंही महंतांनी म्हटले आहे. या महोत्सवात कार्यक्रम घेऊन समाज आपल्या पाठीशी आहे, असं दाखवणाऱ्या लोकांच्या पाठीशी समाज कधीच उभा राहत नाही. भाविक इथे दर्शनासाठी येतात कोणत्याही नेत्यासाठी नाही, भाविक नेत्याच्या पाठीशी नाहीत, अशा शब्दात पोहरादेवी येथील महंतांनी हरिभाऊ राठोड यांना टोला लगावला आहे.
भाविक दर्शनासाठी येतात नेत्यासाठी नाही : महंत सुनील महाराज
30 तारखेला संत सेवालाल महाराजांच्या दर्शनाला संपूर्ण भारतातून दहा ते पंधरा लाख बंजारा भाविक या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे या महोत्सवात कार्यक्रम घेऊन समाज आपल्या पाठीशी आहे, असं दाखवणाऱ्या लोकांच्या पाठीशी समाज नाही. भाविक इथे दर्शनासाठी येतात कोणत्याही नेत्यासाठी नाही, भाविक नेत्याच्या पाठीशी नाहीत. उद्धव ठाकरे यांनी देखील हेच सांगितले, बापूंच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा आदर आहे, पण अशी रेडिमेड गर्दी सभेसाठी आपल्याला नको, यात्रा संपल्यावर कट्टर शिवसैनिकांची सभा आपण घेऊ, असं महंत सुनील महाराज यांनी म्हटलं आहे.
हरिभाऊ राठोड समाजाला न्याय देऊ शकत नाही : महंत जितेंद्र महाराज
तर संपूर्ण भारतभरातून पोहरादेवीला बंजारा भाविक येतात. अशावेळी याठिकाणी अशा सभा घेणं हे चुकीचं आहे. हे भाविक फक्त आपला नवस फेडायला येत असतात. माजी खासदार हरिभाऊ राठोड हे पोहरादेवी जवळ यात्रेच्या दरम्यान तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा पक्ष बीआरएस पक्षाचा मेळावा घेत आहेत. आधी हरिभाऊ राठोड हे भाजपमध्ये होते, मग ते काँग्रेसमध्ये गेले, त्यानंतर आप पार्टीत आणि आता बीआरएसमध्ये गेले. त्यामुळे जो नेता नेहमी नेहमी पक्ष बदलतो तो व्यक्ती समाजासाठी काही करु शकत नाही. लोकांनी ठरवलं आहे की, आपल्याला कोणामागे उभं राहायचं. हरिभाऊ राठोड हे पक्ष वारंवार बदलल्याने ते समाजाला न्याय देऊ शकत नाही, अशा शब्दात महंत जितेंद्र महाराज यांनी हरिभाऊ राठोड यांच्यावर टीका केली आहे.