Wardha News Update : वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामधील तळेगाव (शामजीपंत) नजीकच्या ममदापूर येथे शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या वादळी पावसामुळे ममदापूर जिल्हा परिषदेच्या शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये शाळेच्या छतावरील पत्रे उडून गेले आहेत. एवढेच नव्हे तर नव्या सत्रासाठी नुकतीच आलेली नवी पाठ्यपुस्तके देखील भिजली आहेत. छत उडाल्याने शाळेतील संगणकासह सर्व महत्वाचे साहित्य भिजल्याने यामध्ये शाळेचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. शाळेतील संगणक, रेकॉर्ड, शालेय पोषण आहार देखील पाण्यात भिजला आहे. 


उन्हाळी सुट्ट्या संपत असताना शाळा सुरू होण्यास काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. काही दिवसांतच विद्यार्थ्यांचे या शाळेत उत्साहात आगमन होणार होते. मात्र वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने सर्व वस्तूंची नासाडी झाली. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी उपयोगात येणाऱ्या वर्गातील सर्व वस्तू पाण्यात भिजल्या आहेत. मुलांच्या बाकावरच छत कोसळले आहे. त्यामुळे आता कमी वेळात शाळा पुन्हा कशी उभी करायची? असा मोठा प्रश्न शिक्षकांसमोर उभा राहिला आहे. दरम्यान, आज जिल्हा परिषद सदस्य आणि गटशिक्षणाधिकारी यांनी नुकसानग्रस्त शाळेची पाहणी केली आहे.




गावात अनेक ठिकाणी नुकसान 


शुक्रवारी सायंकाळी वादळ वाऱ्यासह आलेल्या पावसात वर्धा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मोठे नुकसान झाले असल्याचं स्थानिक गावकऱ्यांनी सांगितले.  पाऊस आणि वादळामुळे काही ठिकाणी विद्युत खांब तसेच झाडेही कोसळली आहेत. तळेगावसह जवळपास 40 ते 50 गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता अशी माहिती नागरिकांनी दिली. अनेक ठिकाणी मोठ-मोठी झाडे कोसळली असून शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शुक्रवारी सांयकाळी जवळपास दोन-ते तीन तास वादळ वाऱ्यासह मुसळधाल पावसाने वर्ध्यात हजेरी लावली.   


महत्वाच्या बातम्या


Maharashtra Monsoon Rain LIVE : मुंबईसह परिसरात पावसाची रिपरिप, येत्या 5 दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार


Sowing : राज्यात फक्त एक टक्काच पेरणी, पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या, बळीराजाचे डोळे आभाळाकडं