अमरावती : अमरावती जिल्ह्याला वरदान असलेल्या अप्पर वर्धा धरणाचे 13 दरवाजे उघडण्यात आले आहे.  13 पैकी 9 गेट 70 सेंटिमीटरने तर चार गेट 60 सेंटिमीटरने उघडण्यात आले असून त्यामधून 1392 दलघमी क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. अप्पर वर्धा धरणाची तेराही गेट उघडण्यात आल्याची बातमी पसरताच हे विहंगम दृश्य बघण्यासाठी पाण्याचे तुषार अंगावर झेलण्यासाठी पर्यटकांनी अप्पर वर्धा धरण परिसरात मोठी गर्दी केली आहे.


12 जुलैच्या सायंकाळी 5 वाजतापासून मोर्शी शहर आणि तालुक्यात संततधर पाऊस सुरू आहे. अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्याने धरणाच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली.  अप्पर वर्धा धरणाचे तेरापैकी तेरा दरवाजे उघडण्यात आले आहे. 




अप्पर वर्धा धरणाच्या जलाशयात मध्यप्रदेशातून वाहत येणाऱ्या जाम नदी माडु नदीला मोठ्या प्रमाणात पूर असल्यामुळे अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात गेल्या दोन दिवसात प्रचंड वाढ झाली आहे.  मध्यप्रदेशातून वाहत येणाऱ्या जाम आणि माळु या मोठ्या नद्या दुथडी भरून वाहत असल्याने अप्पर वर्धा धरणाच्या जलाशयात पुन्हा जलसाठा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या अप्पर वर्धा धरणात विविध नद्यांचा येणारा प्रवाह हा 1167 दलघमी क्युसेक असून अप्पर वर्धा धरणाची निर्धारित क्षमता 342.50 मीटर एवढी ठेवण्यात आली आहे. सध्या अप्पर वर्धा जलाशयाची उच्चतम पातळी 341.19 मीटर असून अप्पर वर्धा धरण 80.11 टक्के भरले. त्यामुळे 15 जुलै रोजी अप्पर वर्धा धरणाचे तेराही दरवाजे उघडण्यात आल्याने पर्यटकांना पर्यटन करण्याची संधी प्राप्त झाली आहे. 




मोर्शीच्या उपविभागीय अभियंता मनाली नंदागवळी मोर्शीचे सहाय्यक अभियंता गजानन साने,सुयोग वानखडे या ठिकाणी तळ ठोकून असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. 31 जुलै अखेर जलाशयाची पातळी 341.18 निर्धारित केली आहे. ही निर्धारित लेव्हल जुलै महिन्यातच पूर्ण करण्यात आल्यामुळे अप्पर वर्धा धरणाची तेराही दारे उघडण्याची वेळ पहिल्यांदाच आली आहे. अप्पर वर्धा धरणाची पातळी सप्टेंबर महिन्यात वाढत असल्याने धरणाची गेट उघडण्याची पाळी कधी येत होती. तर कधी येतही नव्हती हे विशेष. मोर्शीचे थानेदार श्रीराम लांबाडे यांच्या नेतृत्वात अप्पर वर्धा धरण परिसरात मोर्शी पोलीस तैनात करण्यात आले असून धरण परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पर्यटकांना आजूबाजूला फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे.