वर्धा : तसं पाहिलं तर बहीण भावंडांच हे नातं म्हणजे एकमेकांसाठी जीव की प्राण असतं. अशात हरवलेल्या बहिणीची आशा घेऊन लहानाचा मोठा झालेल्या अनिकेतला अखेर पोलिसांच्या 'ऑपरेशन मुस्कान'मुळे आपली बहीण गवसलीय. आठ वर्षांच्या बहिणीला घेऊन घरातून बाहेर निघून गेलेल्या आईचा शोध घेणाऱ्या अनिकेतला तब्बल पंधरा वर्षानंतर हरियाणाच्या एका आश्रम शाळेत आपली बहीण मिळाली.
15 वर्षांपूर्वी आईने घर सोडलं
अनिकेत ढोके हा वर्ध्याच्या दयाल नगर येथे राहणारा 26 वर्षांचा युवक . हा तरुण शिकला आणि आता नोकरीला देखील लागला. पण सन 2010 हे वर्ष या तरुणासाठी कुटुंबातील जिव्हाळ्याला विलग करणारं ठरलं. वडील दारू पीत असल्याने आईने आठ वर्षाच्या ईशाला घेऊन घर सोडले. सर्वांनी खूप शोध घेतला पण दोघीही मायलेकी सापडल्या नाही.
अनिकेतच्या काकांनी वर्धा पोलिसात तक्रार दाखल केली. आज ना उद्या आई आणि बहीण मिळेल अशी आशा अनिकेतला होती. तो सतत शोधात राहिला. त्यावेळी केलेली हरवल्याची ही तक्रार आज कामी आली.
हरियाणा अँटी ह्युमन ट्रॅफिक युनिटचे पंचकुलाचे एएसआय राजेश कुमार एकदा सोनिपत येथील बालग्राम आश्रमात कामानिमित्त गेले. त्यावेळी ईशा नावाच्या मुलीने आपल्या आई वडिलांचा शोध घेण्याची विनंती केली. त्यानंतर ईशाचे समुपदेशन करण्यात आले. तिला तिच्या घराबाबत, आई वडिलांबाबत, गावाबाबत फारसे आठवत नव्हते. पण आपल्या घराजवळ रेल्वे स्टेशन आहे आणि आपण लहान असताना बाबांचे नाव चिंधू असल्याची आठवण केवळ तिला होती.
एएसआय राजेश कुमार यांनी विविध ठिकाणच्या 2010 मधील मिसिंग तक्रारींचा शोध घेतला. त्यात वर्ध्यातील शहर पोलिसात 2010 मध्ये करण्यात आलेली तक्रार ईशाच्या प्रकरणाशी जुळून आली. वर्धा पोलिसांनी हरियाणा पोलिसांशी समन्वय साधून तब्बल 15 वर्षानंतर हरवलेल्या चेहऱ्यावर मुस्कान आणण्याचा प्रयत्न केला. अखेर अनिकेतला आपली बहीण मिळाली. सध्या ती हरियाणा येथील सोनिपतरच्याच आश्रम शाळेत आहे. तिचे यावर्षीचे बीए पर्यतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तिला घरी आणले जाणार आहे.
हरियाणा पोलिसांच्या अँटी ह्यूमन ट्रॅफीक युनिटची सतर्कता आणि वर्धा पोलिसांच्या ऑपरेशन मुस्कानच्या प्रयत्नाने विलग झालेली मुलगी आपल्या कुटुंबाला भेटली. आता पुढील आयुष्यात या प्रयत्नाचे बळ मिळणार आहे.
ही बातमी वाचा: