वर्धा : जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील डिगडोह येथे यशोदा नदीला (River) पूर आल्याने तीन शाळकरी विद्यार्थी (School) पाण्यात अडकले आहेत. वाहत्या पुराच्या पाण्यामुळे तिघेही पाण्याने वेढलेल्या उंच ठिकाणी थांबून राहिले. याबाबत माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली, तसेच नगरपालिका (Wardha)आपत्ती व्यवस्थापक पथकाला पाचारणही करण्यात आले. त्यानंतर, पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या तीन विद्यार्थ्यांना वाचविण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले. सुदैवाने विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे. तिघेही शाळेतून परत येत असताना अचानक पाणी वाढले, तर यशोदा नदीच्या जवळ पुलाचे बांधकाम सुरू असल्याने पाणी पातळी वाढली होती.
देवळी नगरपालिका फायर ब्रिगेडची चमू घटनास्थळी पोहचली असून मुलांना सुखरुप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा शोध व बचाव पथक देखील जाग्यावर पोहचले आहे. नागझरी येथील इयत्ता 10 वीच्या वर्गात शिकणारा भाविष कापसे आणि डोगडोह येथील त्याचे दोन सहकारी शाळा सुटल्यावर घरी येत असताना पुराच्या पाण्यात अडकले. यशोदा नदीवर डिगडोह येथे पुलाचे काम सुरू असल्याने पाणी साचून राहिल्याची माहिती आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांना पुलावरुन येताना मोठी कसरत करावी लागत असून त्यातूनच हे तीन विद्यार्थी पुराच्या पाण्यात अडकले होते. दरम्यान, या विद्यार्थ्यांना सुखरुपपणे बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.
बुलढाण्यात सकाळपासून जोरदार पाऊस
बुलढाण्यात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू असून मेहकर तालुक्यातील अनेक नदी-नाल्याना पूर आला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची संततधांर सुरू आहे. तर, मेहकर तालुक्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. मेहकर तालुक्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आल्याने काही गावांचा संपर्क वाशिम जिल्ह्याशी तुटला आहे. कास नदीला आलेल्या पुरामुळे मादणी ,आरेगाव या गावांचा संपर्हीक तुटला आहे.
वाशिम जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत
वाशिम जिल्ह्यात गेल्या 20 तासापासून बरसत असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाला आहे. नागपूर संभाजीनगर महामार्गावर असलेल्या पिंप्री सरहद गावाजवळील उतावळी नदीवर पुराचं पाणी आल्याने जवळपास अनेक तासांपासून रस्ते वाहतूक खोळंबली आहे.
नांदेडमध्ये सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहतोय
नांदेडमध्ये काल मध्यरात्रीपासून दमदार पाऊस झाल्यानंतर सहस्त्रकुंडच्या धबधब्याचे रौद्ररुप पाहायला मिळत आहे. मागील 15 दिवसांपासून पाऊस नव्हता, काल रात्री झालेल्या पावसानं पैनगंगा नदीची पातळी वाढली आहे. त्यानंतर, हा सहस्रकुंड धबधबा ओसंडून वाहत आहे.