Wardha Crime: राज्यात एकतर्फी प्रेमातून मुलींवर हल्ले होण्याचं प्रमाण वाढलं आहे. वर्धा (Wardha) जिल्ह्यातील सेलू तालुक्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या (Murder) करण्यात आली. दहेगाव गोसावी गावातील 23 वर्षीय तरुणीची सोमवारी (2 ऑक्टोबर) रात्री हत्या करण्यात आली. प्रियकराने तरुणीला घराबाहेर बोलावलं आणि अंगणातच चाकूने तिचा गळा चिरून तिची हत्या केली, त्यामुळे गावात खळबळ निर्माण झाली आहे. हत्येनंतर गावात तणाव वाढला आहे.


लोकप्रतिनिधींनी घेतली पीडित कुटुंबाची भेट


संतप्त गावकऱ्यांनी आरोपीच्या गाड्यांची जाळपोळ केली आहे. वर्ध्याचे खासदार रामदास तडस आणि हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांनी मंगळवारी (3 ऑक्टोबर) गावात सांत्वन भेट दिली. दुर्दैवी घटनेत हत्या झालेल्या तरुणीच्या आईवडिलांची त्यांनी भेट घेतली. परिवाराचं लोकप्रतिनिधींकडून सांत्वन करण्यात आलं.


मुलीला न्याय देण्याची कुटुंबियांची मागणी


संबंधित प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी पीडित कुटुंबाने केली असून हे हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या प्रकरणात मुलीला न्याय देण्यासाठी सरकारी वकील उज्वल निकम यांची नेमणूक करावी, अशी मागणी देखील कुटुंबाकडून करण्यात आली आहे.


प्रकरणी चार आरोपी अटकेत


हत्या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. गृहमंत्र्यांशी बोलून जलदगती न्यायालयात खटला चालवून न्याय देण्याचं आश्वासन खासदार आणि आमदार यांच्याकडून पीडित कुटुंबाच्या परिवाराला देण्यात आलं आहे.


चंद्रपुरातही घडला असाच काहीसा प्रकार


प्रेमाला नकार दिल्याने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 19 वर्षीय तरुणाने पेट्रोल (Petrol) टाकल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात (Chandrapur) 12 जून रोजी घडली होती. मुलीने प्रतिकार केल्याने आरोपीने पळ काढला आणि मुलगी बचावली.


काय होतं प्रकरण?


एकतर्फी प्रेमातून (One Sided Love) आरोपीने हे कृत्य केल्याचं समजतं. आरोपी तरुण आणि अल्पवयीन मुलगी एकाच परिसरात राहतात. आरोपीचे संबंधित अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम होते. परंतु मुलीने त्याच्या प्रेमाला नकार दिल्याने आरोपी संतापला. रागाच्या भरात त्याने मुलीला जीवे मारण्याचं ठरवलं. ही मुलगी संध्याकाळी घरात एकटी असल्याचं आरोपीला समजलं. त्याने मुलीच्या घरात प्रवेश केला आणि तिच्या अंगावर पेट्रोल टाकलं. मात्र मुलीने प्रतिक्रार केल्याने आरोपीने तिथून पळ काढला आणि पुढील अनर्थ टळला.


हेही वाचा:


Nashik News : दिंडोरी तालुक्यातील प्रकरणात ट्विस्ट, पीडितेनंतर संशयिताने जीवन संपवलं, पीएसआयसह पोलीस कर्मचाऱ्याचं निलंबन