वर्धा : समृद्धी महामार्गावर निलगाय आडवी आल्याने ट्रक पलटी झाल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास महाकाळ शिवारात घडली. यावेळी ट्रकमधल्या बियरच्या बाटल्यांचा रस्त्याशेजारीच सडा पडल्याने मिळेल तेवढ्या बॉटल्या उचलण्यासाठी नागरिकांची चांगलीच धावाधाव झाली. जेवढ्या हाती येतील तेवढया बॉटल घेत अनेकांनी पळ काढला. दारूबंदी जिल्ह्यात ट्रक पलटी झाल्याने परिसरातील नागरिकांची चांगलीच चांदी झालीय.


नागपुरच्या वाडी येथील निशा ट्रान्सपोर्ट कंपनीचा एम एच 40 पीएम 2615 क्रमांकाचा ट्रक औरंगाबाद येथील एमआयडीसीतून बियरचे बॉक्स घेऊन नागपूरच्या दिशेने जात होता. दरम्यान सदर ट्रकच्या समोर समृद्धी महामार्गावरील वर्धा जिल्ह्यातील महाकाळ शिवारात अचानक मोठी निलगाय आडवी आली. यावेळी उत्तरप्रदेशच्या लखीमपूर येथील ट्रक चालकाने निलगायीला वाचविण्यासाठी करकचून ब्रेक मारला. मात्र यात ट्रक रस्त्याच्या शेजारील खोलगट भागात पलटी झाला. 


ही घटना सोमवारी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास महाकाळ शिवारातील चॅनेल नंबर 52 प्लस 200 नजिक घडली. सदर घटनेत अंदाजे नऊ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असून सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही.
      
सदर घटनेची माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. बियरचा ट्रक पलटल्याची वार्ता कानी पडताच परिसरातील नागरिकांनी सकाळी घटनास्थळी धाव घेत मिळेल तेवढ्या बियरच्या बाटल्या लंपास केल्याची चर्चा आहे.


समृद्धी महामार्गावर वेगाच्या नियंत्रणासाठी एक्झिट मॅनेजमेंट सिस्टीम


समृद्धी महामार्गावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन विभागाने कंबर कसली असून टायर कालबाह्य झालेल्या वाहनांना समृद्धी महामार्गावर धावू न देता परत पाठवले जाणार आहे. तर एक्झिट मॅनेजमेंट सिस्टीमच्याद्वारे वाहनांच्या ओहरस्पीडवर पाळत ठेवली जात आहे.


तुम्ही जर का समृद्धी महामार्गाने प्रवास करण्याचे नियोजन करत असाल तर आधी आपल्या वाहनाचे तयार नीट चेक करून घ्या. कारण तुमच्या टायरचे खूप जास्त घर्षण झाले असेल आणि त्याने 1.6 mm थिकनेस मर्यादा ओलांडली असेल तर परिवहन विभागाचे पथक तुम्हाला समृद्धी महामार्गावरून प्रवास करण्यास मज्जाव करू शकते.


समृद्धी महामार्गाच्या एंट्री पॉईंट आणि एक्झिट पॉईटवर वाहनाने कापलेले अंतर किती वेळात पूर्ण केले यावरून वाहनाचा वेग काढला जातो आणि जर का वेग मर्यादेचे उलंघन केले असल्याचे आढळल्यास त्या वाहनावर कारवाई म्हणून त्याचे 20 मिनिटे  थांबवून उद्बोधन केले जाते.


यासाठी परिवहन विभागाने समृद्धी महामार्गावर नागपूर, जालना, वेरूळ व कारंजा लाड या चार ठिकाणी परिवहन विभागाचे पथक नेमले असून तेथे वाहनांची टायर तपासणी आणि एक्झिट मॅनेजमेंट सिस्टीमने वाहनाच्या वेगावर पाळत ठेवली जात आहे. आतापर्यंत या मोहिमे अनंतर्गत 64 वाहनांवर एक्सिट मॅनेजमेंट सिस्टीमने कारवाई करण्यात आली.