वर्धा :  वर्ध्याच्या सेलू तालुक्यात असलेल्या बोर व्याघ्र प्रकल्पात (Bor Tiger Reserve) दुर्मिळ अस्वल आढळून आलं आहे. हे अस्वल बोर व्याघ्र प्रकल्पातच जन्मल्याचं वनरक्षकाकडून सांगितलं जात आहे. कारण अस्वलाच्या लहानपणीचेही दृश्य इथल्याच कॅमेरात कैद असून आता अडीच ते तीन वर्षांचं झाल्यावरही वनरक्षकांच्या कॅमेरात कैद झालं आहे.


बोर व्याघ्र प्रकल्प आकाराने लहान असला तरी जैवविविधता तसंच वाघ, बिबट, अस्वल, रानकुत्रे, सांभर, चितळ, रोही इत्यादी वन्यप्राण्यांच्या अधिवासामुळे हे व्याघ्र प्रकल्प प्रत्येक पर्यटकांचं आकर्षण बनलेलं आहे. बोरमध्ये आढळलेल्या दुर्मिळ ल्युसिस्टिक अस्वलीने त्यामध्ये आणखी भर टाकलेली आहे. वन्यप्रेमींकडून मिळालेल्या माहितीनुसार बोर व्याघ्र प्रकल्पात अंदाजे 100 पेक्षाही जास्त काळ्या रंगाच्या अस्वलांचा अधिवास आहे. पण 19 मे 2022 रोजी बोरमध्ये फिकट तपकिरी रंगाचं दुर्मिळ "ल्युसिस्टिक स्लॉथ बिअर " (Leucistic Sloth Bear) आढळून आलं. महाराष्ट्रात मेळघाट व्याघ्र प्रकल्पानंतर दुसऱ्यांदा आढळलेलं तपकिरी कोट असलेलं पहिलंच दुर्मिळ ल्युसिस्टिक अस्वल असल्याचं सांगितलं जात आहे.


वनरक्षकांच्या कॅमेरात दुर्मिळ अस्वल कैद 


बोर व्याघ्र प्रकल्पाअंर्तगत आमगाव तपासणी नाका इथे कार्यरत असलेले वनरक्षक मनेशकुमार सज्जन हे 19 मे 2022 रोजी आमगाव रस्त्याने जात असताना त्यांना संध्याकाळी पाचच्या सुमारास एक प्राणी जंगलाकडून निघुन डांबर रस्त्यावर येताना दिसून आलं. त्यामुळे त्यांनी मोटारसायकल थांबवून बारकाईने निरीक्षण केलं असता ते एक अस्वल असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. परंतु ते अस्वल नेहमी आढळणाऱ्या काळ्या रंगाच्या अस्वलापेक्षा निराळं होतं. ते फिकट तपकिरी (Pale Brown) रंगाचं दुर्मिळ ल्युसिस्टिक अस्वल (Leucistic Sloth Bear) होतं. त्याच्या छातीवरील फिकट तपकिरी केसांच्या मधोमध "V" आकाराचे पांढऱ्या रंगाचे चिन्ह ठळकपणे दिसत होतं. वनरक्षक सज्जन यांनी आपल्या कॅमेरात हे अस्वल कैद केलं असून ते "ल्युसिझम" या अत्यंत दुर्मिळ विकाराने ग्रस्त असल्याचं सांगितलं जात आहे.


बोर व्याघ्र प्रकल्पात प्रथमच दुर्मिळ ल्युसिस्टिक अस्वल?  


2016  मध्ये तपकिरी कोट असलेले ल्युसिस्टिक अस्वल गुजरात राज्यातील दाहोदच्या जंगलात आढळून आलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पात 3 एप्रिल 2020 रोजी पांढरे कोट असलेले अडीच ते तीन वर्षाचं ल्युसिस्टिक अस्वल प्रथमत: आढळून आलं. बोर व्याघ्र प्रकल्पात प्रथमच दुर्मिळ ल्युसिस्टिक वन्यप्राणी अस्वल आढळल्याने अनेक वन्यजीव अभ्यासकांसह वन्यजीव प्रेमींमध्ये हे अस्वल पाहण्याची ओढ लागली आहे. जंगल सफारीकडे कल वाढला आहे. 


पीपल्स फॉर अॅनिमल्सचे आशिष गोस्वामी यांची प्रतिक्रिया 


बोर व्याघ्र प्रकल्प आणि आर्वी वनविभागाच्या क्षेत्रात फिकट तपकिरी रंगाचं अस्वल आढळून आलं. हा कुठला आजार नाही, परिस्थिती किंवा बिहेवीरल चेंजेसमुळे प्राण्यांच्या शरीराचा रंग बदलू शकतो.


मनेशकुमार सज्जन ,वनरक्षक बोर व्याघ्र प्रकल्प,बोरधरण : 


बोरमध्ये ल्युसिस्टिक अस्वल आढळल्याची बातमी सत्य आहे. बोर व्याघ्र प्रकल्पात मोठ्या प्रमाणात काळ्या रंगाच्या अस्वलांचा अधिवास आहे. परंतु ल्युसिझम" या अत्यंत दुर्मिळ विकाराने ग्रस्त असलेले तपकिरी रंगाचं पहिलंच अस्वल असल्याचं माझं मत आहे. 


या अस्वलाचा जन्म बोर व्याघ्र प्रकल्पातच झालेला आहे, कारण 13 मार्च 2020 रोजी शुभम पाटील या पर्यटकाला सदर अस्वल 3 ते 4 महिने वयाचे शावक असताना आईसोबत आढळून आले होते. त्याचबरोबर बोर व्याघ्र प्रकल्पात लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्येही 24 मार्च 2020 रोजी सकाळी 9.25 वाजता  मादी अस्वल 2 शावकांना पाठीवर घेऊन फिरतानाचे दृश्य कैद झाले होते. 


दोन शावकापैकी एक काळ्या रंगाचे आणि दुसरा तपकिरी रंगाचे होते.  9 मे 2022 रोजी मला दिसलेल्या दुर्मिळ ल्युसिस्टिक अस्वलाचे वय सुध्दा  जवळपास अडीच वर्षाचे होते. महाराष्ट्रात आढळणाऱ्या (मेलियुरसस उर्सिनस) अस्वलांचा समागमकाळ उन्हाळ्यात असतो आणि गर्भधारणेचा कालावधी 7 ते 9 महिन्याचा असतो. 


त्यामुळे सरासरी डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात शावक जन्माला येतात. अस्वल सरासरी 1 ते 2 पिल्लांना जन्माला घालते. काहीवेळा 2 पेक्षा अधिक शावक ही जन्म घेतात. शावकांचा जन्म झाल्यानंतर त्यांचे  प्रथमत: वजन फक्त 250 ग्रामपर्यंतच असते आणि त्यांचे डोळे बंद असतात. त्यामुळेच जवळपास 3 महिन्याचे पिल्लू होईपर्यंत मादी अस्वल तिच्या शावकांना गुहेबाहेर काढत नाही. 


3 महिने वयाचे शावक झाल्यावर शावक त्यांचे आईच्या पाठीवर बसून बाहेर फिरताना आढळून येतात. अस्वलांमध्ये नर आणि मादी दिसायला सारखेच असल्यामुळे दुरवरून पाहून त्यांचे सहजासहजी लिंग ओळखता येत नाही, त्यामुळे मला दिसलेले दुर्मिळ अस्वल नर आहे का मादी हे मला कळाले नाही.