Maharashtra Wardha News : आष्टी तालुक्यातील ममदापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अवस्था अतिशय दयनीय झाली असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण करण्यास कारणीभूत ठरत आहे. जून महिन्यात ममदापूर येथील शाळेचं छत वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसात उडून गेलं होतं. त्यामुळे वर्ग खोलीतील शिक्षण उपयोगी साहित्य भिजल्यानं मोठं नुकसान झालं होतं. त्यानंतर अद्यापही या शाळेची स्वच्छता करण्यात आली नाही. घटनेला दोन महिने होत आहेत, तरी विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या गैरसोईकडे प्रशासनाचं लक्ष नाही. शाळेचं नुकसान झाल्यामुळे तातडीनं प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या होत्या. मात्र त्या तातडीच्या सूचनेला कुठे सुरुंग लागला देव जाणे, कारण दोनदा प्रस्ताव पाठवूनसुद्धा प्रशासनाला जाग आलेली नाही. 


शिक्षणाची पर्यायी व्यवस्था मात्र जीवाला धोका 


सध्या विद्यार्थ्यांची व्यवस्था पर्यायी ठिकाणी केली आहे. मात्र ज्या ठिकाणी विद्यार्थी बसतात तिथेही फॅन, लाईटची व्यवस्था नाही. खिडक्यांना व्यवस्थित दरवाजे नाही, छताला गळती लागलीय, इतकेच नाही तर त्या खोलीमध्ये सरपटणाऱ्या प्राण्यांना सोयीस्कर अशी जागा बनली आहे. जिथे एखादा सरपटणारा प्राणी अगदी सहज लपून बसू शकतो. यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला काही झालं तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. असंख्य संकटांना सामोरं जात तेथील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. केवळ एका शिक्षिकेवर या शाळेचा कार्यभार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होतं हे निश्चित.




शिक्षणोपयोगी साहित्याचं नुकसान


ममदापूर येथील शाळेचं जून महिन्यात पावसामुळं नुकसान झालं त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सोयीकडे प्रशासनाच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे लक्ष केलं गेलं नाही. विद्यार्थी शाळेत येण्यास काहीच दिवस बाकी असताना पावसामुळे संगणक भिजले, दस्ताऐवज भिजले, विद्यार्थ्यांना वाटपाची पुस्तकं आणि अनेक शिक्षण उपयोगी साहित्याचं नुकसान झालं होतं. सध्या शाळेत 30 विद्यार्थी शिक्षण घेत असून शाळेत असलेल्या असुविधांमुळे शाळेतील पटसंख्या कमी होत असल्याचं शिक्षिकेनं सांगितलं.





शाळा स्वच्छ तर विद्यार्थ्यांना अभ्यासात रस 


कुठलीही शाळा जर स्वच्छ सुंदर आणि सोयी सुविधांनी युक्त असेल तर विद्यार्थी ही शाळेमध्ये रमतो आणि शिक्षणात त्याला रस निर्माण होतो. अनेकदा बघितलं जातं की, ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना शिक्षणात रस कमी असतो. त्याचं कारण जिल्हा परिषदेच्या शाळांची असलेली दयनीय अवस्था आहे का? असा प्रश्न उद्भवला आहे. अनेक शाळांमध्ये केवळ एकाच शिक्षिकेवर संपूर्ण शाळेचा भार आहे. त्यामुळे कार्यालयीन काम करावीत की, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावं असा पेच निर्माण झाला असून विद्यार्थ्यांकडे पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचं वास्तव आहे. ममदापूरच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये शिकत असलेले चिमुकले विद्यार्थी सुविधा नसलेल्या ठिकाणी शिकत आहेत. याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन प्रशासनानं विकासाची पाऊल पुढे टाकावीत अशीच अपेक्षा आहे.