मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक आणि कथालेखक वामन होवाळ यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असं त्यांचं कुटुंब आहे.


आज संध्याकाळच्या सुमारास वामन होवाळ यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असतानाच त्यांचं निधन झालं.

शंकर पाटील, द. मा. मिरासदार, व्यंकटेश माडगूळकर यांच्यानंतरच्या पिढीतील प्रमुख कथाकथनकार म्हणून महाराष्ट्र वामन होवाळ यांना ओळखतो. कथाकथनासाठी त्यांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. आंबेडकरी साहित्य चळवळीमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता. अनेक राज्यस्तरीय साहित्य संमेलनांचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहेत.

वामन होवाळ हे मूळचे सांगलीतील तडसर गावचे होते. उच्च शिक्षणासाठी ते मुंबईला आले. शालेय वयातच कथालेखनाची आवड निर्माण झाली. शंकर पाटील यांच्या लेखनातून कथा लिहिण्याची प्रेरणा मिळाली. त्यानंतर त्यांनी पुढे कथालेखन सुरु केले.

ऑडिट, बेनवाड, वारसदार, येळकोट, वाटा आडवाटा इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. मजल्यांचे घर आणि पाऊसपाणी या कथा इंग्रजी आणि फ्रेंच या भाषेतही अनुवादित झाल्या आहेत. तर जपून पेरा बेणं, आंधळ्याची वरात बहिऱ्याच्या घरात ही लोकनाट्येही प्रसिद्ध आहेत.

ग्रामीण जगण्यातील खाच-खळग्यांचं निरीक्षण करुन कथालेखन, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य. मात्र, सुरुवातीला ग्रामीण कथालेखक अशी ओळख असणाऱ्या वामन होवाळ यांनी पुढे विविध प्रकारांमधील कथा लिहिल्या.

वामन होवाळ यांनी कथाकथनाचे महाराष्ट्रभर अनेक कार्यक्रम केले. घरात ‘दादा’ म्हणून ओळखले जाणारे होवाळ हे कथाकथनातील खऱ्या अर्थाने ‘दादा’च होते. वामन होवाळ यांच्या निधनाने मराठी साहित्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.