Bhandara News भंडारा : उपराजधानी नागपूरसह विदर्भातील (Vidarbha) बहुतांश जिल्ह्यांना रविवारच्या सकाळपासून कोसळणाऱ्य  धुव्वाधार पावसाने (Heavy Rain)  (Heavy Rain) धो- धो धुतलंय. दरम्यान, अजून देखील काही भागात पावसाचा जोर कायम असून संभाव्य पावसाचा धोका लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या (IMD) वतीने केले आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका पूर्व विदर्भाला बसला आहे. अशातच रविवारला भंडारा (Bhandara News) जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यानं जिल्ह्यातील नदी - नाले दुथडी भरून वाहू लागलेत. अतिवृष्टीमुळं जिल्ह्यातील तलाव आणि जलाशयांच्या पाणी पातळीतही वाढ झाली. 


लाखनी तालुक्यातील खुर्सिपार येथे बांधण्यात आलेल्या जलाशयाच्या पाणी पातळीत वाढं झाल्यानं वितरकीच्या माध्यमातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. मात्र, मुसळधार पावसाच्या प्रवाहात ही वितरिका सालेभाटा गावाजवळ फुटली. त्याचं संपूर्ण पाणी या परिसरात असलेल्या हजारो हेक्टर मधील भात पिकांच्या शेतात शिरल्यानं भातपीक पाण्याखाली आलं आहे. त्यामुळे शेकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी या भागातील संपूर्ण शेतीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करावी, अशी मागणी भंडारा काँग्रेस सेवा दल जिल्हाध्यक्ष कैलास रणवीर यांनी केली आहे.


डोळ्या देखत खरडून गेली लाखो रुपये खर्चून उभारलेली शेती


मागील आठवड्याच्या अतिवृष्टीनंतर कसं बसं सावरत असतानाच रविवारला पुन्हा एकदा भंडारा जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं. या अतिवृष्टीचा फटका मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बसला आहे. भंडारा तालुक्यातील पलाडी शेतशिवारात लाखो रुपये खर्च करून उभारलेली सहा एकरातील बागायती शेती या अतिवृष्टीनं अक्षरशः डोळ्यादेखत खरडून गेली. सहा एकरातील पीक 24 तासापेक्षा अधिक तास पाण्याखाली राहिलं आणि पाण्याच्या प्रचंड प्रवाहानं शेतीचं प्रचंड नुकसान झालं. शेतीचा तातडीनं पंचनामा करावा, यासाठी शेतकरी शरद गिदमारे यांनी महसूल आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना फोन द्वारे माहिती दिली. मात्र, 72 तासांचा कालावधी लोटूनही त्यांच्याकडं कोणीही फिरकले नसल्याची खंत त्यांनी एबीपी माझा कडं बोलून दाखविली. 


अतिवृष्टीमुळं 23 हजार 260 हेक्टरमधील पिकांचं नुकसान, 519 गावांना फटका


19  ते 29 जुलै या दहा दिवसात झालेल्या भंडारा जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या नुकसानीचा नजर अंदाजचा सुधारित अहवाल भंडारा जिल्हा प्रशासनानं सादर केला आहे. यात 519 गावांना याचा फटका बसला असून 23 हजार 260 हेक्टर मधील पिकांचं नुकसान झालं आहे. या अतिवृष्टीचा फटका 49 हजार 197 शेतकऱ्यांना बसला आहे. भात पीक, तुर, सोयाबीन, बागायती शेती, कापूस या पिकांचा यात समावेश आहे. सर्वाधिक फटका पवनी तालुक्याला बसल्याची नोंद या अहवालात करण्यात आली आहे.


हे ही वाचा