Nagpur News : ज्येष्ठ कथाकार आणि कादंबरीकार व अभिव्यक्ती संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया अय्यर (Supriya Iyer) यांचे काल (23 डिसेंबर) रात्री निधन झाले. त्या कर्करोगाने ग्रस्त होत्या आणि त्यांच्यावर जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट येथे उपचार सुरू होते. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ढासळत गेली. अखेर, सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यावेळी त्या 74 वर्षाच्या होत्या. अय्यर यांच्या पश्चात दोन मुले, सुना आणि नातवंडे आहेत.


अय्यर यांनी 12 वर्षांपूर्वी अभिव्यक्ती संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारले आणि संस्थेला नावारुपात आणण्यात मोठे योगदान दिले. आपल्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांना लिहिते केले. 2022 मधील साहित्य संमेलनासह त्यांनी नागपुरात विविध साहित्यिक आयोजने यशस्वी केली. अभिव्यक्तीच्या माध्यमातून विविध साहित्यिक उपक्रम त्यांनी सातत्याने राबविले. अय्यर यांच्या ‘ शुद्ध वेदनांची गाणी, कन्याकोलम आणि अजन्मा या तीन कादंबऱ्या प्रकाशित झाल्या होत्या. त्याचप्रमाणे, अय्यर यांनी ललित लेखनासह आकाशवाणीसाठी अनेक श्रुतिका, कथा व लेख लिहिले आहेत. 


मेडिको सोशल वर्कर म्हणून काम केलेल्या अय्यर या राज्य शासनाच्या एड्‌स नियंत्रण सोसायटीवर अनेक वर्ष कार्यरत होत्या. त्या राज्य शासनाच्या वाङ्‌मय पुरस्कार समिती तसेच राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या माजी सदस्या होत्या. अय्यर यांचे खुळी बोगनवेल, सोन्याचे दरवाजे आणि किनखापी मोर  हे कथासंग्रह, ‘सनान रे बोंद्र्या’ हा वऱ्हाडी कथा संग्रह,“चांदणचुरा’  व ‘काही शुभ्र कमळे’ हे ललित लेख संग्रह प्रसिद्ध होते. त्यांच्या ‘खुळी बोगनवेल’, ‘किनखापी मोर’ या कथासंग्रहांना विदर्भ साहित्य संघाचे पुरस्कार मिळाले होते. याशिवाय, अन्य संस्थांचे विविध पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले होते.


आशयघन सिनेसृष्टीचा चेहरा हरपला, श्याम बेनेगल कालवश


 देशातील नामांकित चित्रपट निर्माते आणि 8 वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेता श्याम बेनेगल यांचे निधन झाले.  मुंबईतील वोकॉर्ट रुग्णालयात आज सायंकाळी 6.38 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती त्यांची कन्या पिया बेनेगल यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते, मूत्रपिंडाच्या आजाराने ते त्रस्त होते, त्यांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्यामुळे त्यांना यापूर्वी देखील अनेकदा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून मूत्रपिंड निकामी झाल्याने त्यांच्या घरीच डायलिसिस सुरू होते. विशेष म्हणजे नुकतेच त्यांचा 90 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता, अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.


श्याम बेनेगल हे फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते, सह्याद्री फिल्म्स नावाच्या कंपनीचे ते मालक होते. त्यांनी द चर्निंग विथ विजय तेंडुलकर (1984), सत्यजित रे (1988), आणि द मार्केटप्लेस (1989) या त्यांच्या स्वतःच्या चित्रपटांवर आधारित तीन पुस्तके लिहिली आहेत. त्यांना 8 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, एक फिल्मफेअर पुरस्कार आणि नंदी पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे. 


हे ही वाचा