Vadhavan Port Palghar: मागील 25 वर्षांपासून रखडलेला केंद्र सरकारचा वाढवण बंदर (Vadhavan Port)  हा महत्त्वकांक्षी प्रकल्प अखेर मार्गी लागला आहे.  काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाढवण बंदराला अखेरची मंजुरी मिळाली असून यावर सध्या जिल्हा आणि राज्यभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागले आहेत . या बंदराला स्थानिकांचा तीव्र विरोध असून कोणत्याही परिस्थितीत हे बंदर होऊ देणार नाही असा इशारा स्थानिक भूमिपुत्रांनी दिला असला तरी या बंदरामुळे पालघर जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि देशाचा कायापालट होईल असं सत्ताधारी आणि काही बंदराच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे.


पुढील वर्षी पावसाळ्यानंतर बंदराच्या समुद्रातील कामाला सुरुवात केली जाणार आहे. त्यापूर्वी बंदराकडे जाण्यासाठी नव्या रस्त्यांच्या उभारणीला यंदा सप्टेंबरनंतर सुरुवात होईल, अशी माहिती जेएनपीएच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. वाढवण येथे ७६ हजार २२० कोटी रुपये खर्चुन ग्रीनफिल्ड बंदराची उभारणी केली जात आहे. समुद्रात सहा किलोमीटर आतमध्ये हे बंदर उभारले जाणार असून त्यासाठी समुद्रात सुमारे १४४८ हेक्टर एवढा भराव टाकला जाणार आहे. या बंदरामुळे दरवर्षी २९८ दशलक्ष मेट्रिक टन मालाची हाताळणी करणे शक्य होणार आहे. त्यात सुमारे २३.२ मिलियन टीईयू कंटेनर हाताळणी क्षमतेचा समावेश असेल.


५७१ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण


स्थानिकांना रोजगाराच्या संधी या प्रकल्पामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार असून त्यासाठी त्यांना २८ प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामध्ये मालाची वाहतूक करण्यासाठी केवळ ५० हजार ट्रक ड्रायव्हर्सची गरज पडणार आहे. त्यातून स्थानिकांना रोजगाराच्या भरपूर संधी आहेत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. भारतातील सर्वांत मोठ्या बंदराच्या प्रत्यक्ष कामासाठी जमीन अधिग्रहणाची गरज पडणार नाही. मात्र मालाची ने-आण करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या रस्ते आणि रेल्वे मार्गासाठी ५७१ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करावे लागणार आहे


वाढवण बंदर विरोधातील लढा आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा


मागील पंचवीस वर्षांपासून स्थानिकांचा तीव्र विरोध असताना देखील केंद्र सरकारने वाढवन बंदर उभारण्याचा हुकूमशाही पद्धतीने घाट घातला असून केंद्रीय मंत्रिमंडळाने परवानगी दिली असली तरी देखील हरित लवादा तसंच स्थानिक पातळीवर आम्ही वाढवण बंदर विरोधातील लढा आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा वाळवण बंदर विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील यांनी दिला आहे.


वाढवण बंदराची सकारात्मक बाजू-


वाढवण बंदर उभारल्यास येथील लाखो नागरिकांना रोजगार मिळणार असल्याचा जेएनपीएचा दावा. 


वाढवण बंदराच्या उभारणीमुळे देशाच्या विकासाला नवी चालना मिळणार असल्याचा जेएनपीएचा दावा. 


वाढवण बंदर हे समुद्रात असल्याने कोणालाही विस्थापित केलं जाणार नसल्याची जेएनपीएची ग्वाही.


वाढवण बंदरामुळे शंखोदराला कुठलाही धोका नसल्याचाही जेएनपीएचा दावा. 


वाढवण बंदरामुळे पालघरचा विकासात्मक कायापालट होणार असल्याचा जेएनपीएचा दावा


वाढवण बंदराची नकारात्मक बाजू-


वाढवण बंदरामुळे स्थानिक मच्छीमारांचा रोजगार जाणार असल्याचा स्थानिकांचा आरोप. 


बंदर झाल्यास जिल्ह्यातील मासेमारी कायमची नाहीशी होऊन याचा परिणाम येथील मच्छीमारावर अवलंबून असलेल्या वाढवन बंदर हजारो कुटुंबांवर होईल अशी मच्छीमारांमध्ये भीती.


बंदर झाल्यास येथील जैवविविधतेवरही परिणाम होणार.


वाढवण बंदरामुळे डहाणू हा हरित पट्टा प्रभावित होणार असून यामुळे येथील पर्यावरणाचा ऱ्हास होण्याची भीती. 


वाढवण सह परिसरातील बागायतदार आणि लहान व्यावसायिक देशोधडीला लागणार असल्याचा स्थानिकांचा आरोप. 


वाढवण येथे प्रभू श्रीरामांच्या काळापासून असलेले शंखोदर देखील नाहीस होणार असल्याची स्थानिकांमध्ये भीती.


वाढवण बंदरामुळे तारापूर अनुविद्युत केंद्राला देखील धोका पोहोचणार असल्याचा स्थानिकांचा आरोप.


संबंधित बातमी:


Palghar Vadhavan: पालघरच्या वाढवण बंदराला केंद्राची मंजुरी, मात्र स्थानिकांकडून विरोध तर काहींकडून पाठिंबा