जळगाव: सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या (Jalgaon Murder) करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती कळताच शेकडोच्या संख्येने जमावाने पोलीस स्टेशनवर (Jamner Police station) मोर्चा काढत आरोपीला ताब्यात देण्याची मागणी पोलिसांच्याकडे केली होती. मात्र, पोलिसांनी आरोपीला सुरक्षित ठिकाणी हलवल्याचे कळताच जमाव प्रक्षुब्ध झाला आणि जामनेर पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक करण्यात आली. 


या घटनेत मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जामनेरमध्ये दगड आणि जाळपोळ झाल्याच्या घटनेनंतर जखमी पोलिसांना जळगाव मधील खासगी आणि जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी  रुग्णालय जाऊन जखमी पोलीस कर्मचाऱ्यांशी विचारपूस केली. मंत्री गिरीश महाजन यांनीही फोनवरून या सगळ्या घटनेसंदर्भात पोलीस यंत्रणा ,जखमी आणि प्रशासकीय यंत्रणांकडून माहिती घेतली आणि आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. जामनेरमध्ये परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणावपूर्ण शांतता आहे.


कोणालाही सोडले जाणार नाही, जळगाव पोलिसांची ग्वाही


बालिकेवर अत्याचार (Rape) आणि हत्या करण्यात आलेल्या आरोपीला अटक केल्यानंतर ही काही समाजकंटकांनी कायदा हातात घेत पोलिसांवर दगडफेक केली,तोडफोड केली. सीसीटीव्ही फुटेज तपासून या सर्व लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. या घटनेसाठी जबाबदार असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही, अशी ठाम भूमिका पोलिसांनी घेतल्याची माहिती जळगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिली. 

गुरुवारी रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी ही घडली. काही दिवसांपूर्वी जामनेर पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले होते. काल रात्री बेकायदेशीर जमाव पोलीस ठाण्याबाहेर जमला होता. आम्ही याप्रकरणात योग्य ती कारवाई करु, तुम्ही कायदा हातात घेऊ नका, असे आवाहन पोलिसांनी जमावाला केले. मात्र, जमावाने पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. यामध्ये पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. आम्ही दगडफेक करणाऱ्या प्रत्येकाला ताब्यात घेऊ, असेही अशोक नखाते यांनी सांगितले.


जखमी पोलीस अधिकाऱ्यांवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याला फार मोठी दुखापत झालेली नाही. दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मायनर फ्रॅक्चर असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.


आणखी वाचा


पुण्यात ‘फादर्स डे’च्या दिवशी बाप झाला हैवान, चार वर्षाच्या चिमुरडीला चाकूचे चटके देत शारीरिक अत्याचार