नागपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये 18 वर्षावरील सर्वांच्या कोव्हिड प्रतिबंधात्मक बुस्टर डोसच्या नि:शुल्क लसीकरणाला सुरुवात झाली आहे. कोरोना व्हायरसपासून सुरक्षेच्या दृष्टीने मनपाद्वारे 'हर घर दस्तक' मोहिमेद्वारे पात्र सर्व व्यक्तींना घरी जाउन बुस्टर डोस देण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 15 सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या लसीकरण मोहिमेमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी बुस्टर डोस घ्यावे यासाठी मनपाने महत्वपूर्ण पुढाकार घेतला आहे.


जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लस देण्यासाठी सध्या सुरु असलेल्या 50 स्थाई लसीकरण (Booster dose) केंद्रांव्यतिरिक्त नव्याने अधिकचे 90 लसीकरण पथक तयार करण्यात आले आहेत. या पथकामध्ये परिचारिका, व्हेरीफायर व आशा सेविकांचा समावेश आहे. याशिवाय शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, मॉल्स, खाजगी अस्थापना, कारखाने, कंपनी व मोठ्या प्रमाणात लाभार्थी उपलब्ध असलेल्या इतर सर्व अस्थापनांमध्ये विशेष लसीकरण शिबिर सुद्धा घेण्यात येत आहेत. ज्या आस्थापनांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी विशेष शिबिराचे आयोजन करायचे असेल त्यांनी नागपूर महानगरपालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा झोनल वैद्यकीय अधिकारी यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे करण्यात येत आहे. आगामी गणेशोत्सवात गणेश मंडळांच्या सहकार्याने विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. गणेश मंडळांनी याकरीता आरोग्य विभाग महानगरपालिका यांचेशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात येत आहे.


नागपूर शहरातील मनपाच्या व शासकीय केद्रांवर कोव्हिड प्रतिबंधक लसीचा पहिला, दुसरा आणि बुस्टर डोस नि:शुल्क उपलब्ध आहे. कोव्हिशील्ड लस सोमवार ते शनिवार सर्व केद्रांवर उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच कोव्हॅक्सीन लस सोमवार ते शनिवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, अनुसंधान केंद्र व मनपासह 7 केद्रांवर दिली जाईल. यासोबतच शनिवारी कॉर्बेव्हॅक्स () लस 12 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांना सर्व केद्रांवर दिली जाईल.


कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन यापैकी कोणत्याही लसीचे दोन्ही डोस घेउन 6 महिन्याचा कालावधी पूर्ण झालेल्या 18 वर्षावरील वयोगटातील नागरिकांना बुस्टर डोस घेता येणार आहे. यासाठी शहरात प्रत्येक झोनमध्ये विविध ठिकाणी लसीकरण केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता प्रत्येक पात्र व्यक्तीचे लसीकरण आवश्यक आहे. स्वत:च्या आरोग्यासह इतरांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही लसीकरण महत्वाचे आहे. त्यामुळे लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्या आणि दुसऱ्या डोसपासून सहा महिने पूर्ण झालेल्या प्रत्येक पात्र व्यक्तीने लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. 
 
आतापर्यंत 15695 नागरिकांनी घेतला बुस्टर डोस


कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सर्व पात्र व्यक्तींचे लसीकरण पूर्ण करून ज्यांचे लसीकरण पूर्ण झाले त्यांना बुस्टर डोस देण्याचा महत्वाचा निर्णय केंद्र सरकारद्वारे घेण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने नागपूर (Nagpur) शहरातील बुस्टर डोससाठी पात्र प्रत्येक व्यक्तीच्या लसीकरणासाठी मनपाद्वारे (Nagpur Municipal Corporation) विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. 15 ते 20 जुलै या कालावधीत नागपूर शहरात 18 ते 44 वयोगटातील 6908, 45 ते 59 वयोगटातील 6531 आणि 60 वर्षावरील वयोगटातील 2256 अश्या एकूण 15695 नागरिकांनी बुस्टर डोस घेतला आहे.