बुलडाणा: मध्यावधी निवडणुकीसाठी तयार असल्याचं म्हणत असाल, तर जो पैसा निवडणुकीसाठी आहे, तो पैसा शेतकऱ्यांना द्या, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.  ते शेगावमध्ये बोलत होते.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच मध्यावधी निवडणुकीसाठी तयार असल्याचं म्हटलं होतं.

त्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "कर्जमुक्तीच्या विषयाला फाटा देण्यासाठी मध्यावधीचा विषय काढला जात आहे. मध्यावधीला तुम्ही तयार आहात म्हणजे तुमच्याकडे बक्कळ पैसा आहे. हाच पैसा तुम्ही शेतकऱ्यांना द्या. मध्यावधीची गरज लागणार नाही, आम्ही पाठिंबा देऊ."

सरकारने कोणतेही निकष न लावता सरसकट कर्जमाफी न केल्यास आम्ही राजकीय भूकंप घडवू, असा पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी केला.

"मी शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. सत्तेची पर्वा न करता शेतकऱ्यांना  पाठिंबा दिला. सरसकट शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा ही शिवसेनेची मागणी कायम आहे", असं ठाकरेंनी नमूद केलं.

"कर्जमुक्तीची घोषणा करणाऱ्या सरकारला त्याची अंमलबजावणी करण्याची सुबुद्धी आणि ताकद द्या अशी प्रार्थना शेगावच्या गजानन महाराजांकडे केली आहे" असं उद्धव ठाकरे म्हणाले.

"देशभरातील  शेतकरी पेटून उठतो आहे. या क्रांतीची सुरुवात माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी केली, याचा आनंद. या गोष्टीचा आनंद की सरकारने आंदोलन पेटण्याआधीच कर्जमुक्तीचा निर्णय घेतला. शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे", असा विश्वास त्यांनी दिला.

आता शेतकऱ्यांच्या हाता- तोंडाशी आलेला घास जाऊ देणार नाही. 2008 ची कर्जमाफी अटींसह होती. आता तसे होऊ नये अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे  आम्ही निकष ठरवत  असल्याचं सांगितलं. मात्र हे निकष शेतकरी नुकसानीचे असू नयेत असं मी त्यांना सांगितलं, असं उद्धव म्हणाले.

साले म्हणणाऱ्यांना शेतकरी धडा शिकवतील

शेतकऱ्यांविरोधात जे जे बोलले, मग ते अजित पवार असो वा शेतकऱ्यांना साले म्हणणारे (रावसाहेब दानवे) असो, शेतकरी प्रत्येकाला धडा शिकवतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

तसंच कृषीप्रधान देशात शेतकऱ्याला तुच्छतेची वागणूक मिळत असल्याची खंतही उद्धव यांनी व्यक्त केली.