मुंबई: दीर्घ सुट्यांच्या आनंदानंतर आज राज्यातील शाळा सुरु होत आहेत. हा दिवस विद्यार्थ्यांचा ‘गोड’ जावा, यासाठी राज्यभरातील विविध शाळा विद्यार्थ्यांचं अनोख्या पद्धतीनं स्वागत करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

मुंबई शहर आणि उपनगरातील शाळा आजपासून सुरु झाल्या. खासगी तसेच महापालिकांच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी शिक्षक, मुख्याध्यापकांनी केली आहे.

आजपासून पुन्हा एकदा शाळेची घंटा नाद घुमणार असून शाळेत गजबज सुरु होईल. नवीन इयत्ता, नवीन युनिफॉर्म, नवीन पुस्तके यामुळे विद्यार्थी उत्सुक आहेत.

कोल्हापूरमध्ये मिकी माऊसने विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. मिकी माऊससोबत विद्यार्थ्यांनी धमाल मस्ती केली.



तिकडे उस्मानाबादमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांचं गुलाबाचं फूल देऊन स्वागत करण्यात आलं. यावेळी शाळेचं शिक्षक, मुख्याध्यापक शाळेच्या दारावर उभे होते. त्यामुळं मुलांचा उत्साहही द्विगुणीत झाला.

तर जळगावमध्येही लहान मुलांना गुलाबाचं फुलं देऊन, त्यांना ओवाळून स्वागत करण्यात आलं आहे.



दप्तराचं ओझं उतरवणार

आजच्या शाळेच्या पहिल्याच दिवशी सरकारनं विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं उतरवण्यास सुरुवात केली आहे. शिक्षण विभागानं असा शासन आदेश काढला असून प्रत्येक महिन्याला शाळेतल्या काही विद्यार्थ्यांच्या दप्तराचं वजन करुन त्याची माहिती शिक्षण संचालकांना कळवायची आहे.

शिक्षणाधिकाऱ्यांकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

ज्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या दप्तराचं वजन मर्यादेपेक्षा जास्त असेल त्या शाळेतल्या मुख्याध्यापकांना याला जबाबदार धरण्यात येईल, असं या आदेशात सांगण्यात आलं आहे. मात्र असं असलं तरी मुलांच्या दप्तराचं वजन करण्याची जबाबदारी शिक्षकांवरच पडणार आहे.