मुंबई : राज्यातील कर्जमाफीसंदर्भात राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'मातोश्री'वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी कार्यकर्ते फोडण्यावरुन दोघांनीही एकमेकांना चिमटे काढले.

सरकारी तिजोरीत खडखडाट असल्याने चंद्रकांत पाटील यांचा कर्जमाफी करताना निकष आणि अटींवर जोर होता. 'तर आमचे कार्यकर्ते फोडायला तुम्ही 2 ते 5 कोटी द्यायला तयार असता, मग आमच्या शेतकऱ्यांना द्यायला तुमच्याकडे पैसा का नाही', असा चिमटा उद्धव यांनी चंद्रकांत दादांना काढला.

यावर 'पैसे घेऊन सुद्धा तुमच्यापर्यंत या बातम्या कार्यकर्ते पोहचवतात?', असा मिश्किल सवाल चंद्रकांतदादांनी त्यांच्या शैलीत उद्धव ठाकरेंना विचारला.

'आता राष्ट्रपती निवडणुकीच्या चर्चेसाठी अमित शाह मातोश्रीवर आल्यावर त्यांच्याशी या फोडाफोडीवर चर्चा करू' असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि शिवसेनेचे मंत्रीही उपस्थित होते.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कसा फायदा होईल यासाठी शिवसेनेकडून सहकार्य अपेक्षित आहे, अशी अपेक्षा चंद्रकांत पाटील यांनी बैठकीनंतर व्यक्त केली. तर सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करावा या मागणीवर शिवसेना ठाम असल्याचं दिवाकर रावते यांनी सांगितलं.