Bhivandi News : भिवंडीत माती खणलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी जमा झाल्याने या खड्ड्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी पोगाव - डोंगरपाडा परिसरात घडली आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अली शेख वय 17 वर्ष आणि सानीब अंसारी वय 16 वर्ष असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या दोघा मुलांची नावे आहेत. अली आणि सानीब हे दोघेही शांतीनगर परिसरात राहणारे होते. ते आपल्या इतर तीन मित्रांसह पोगाव डोंगरपाडा येथे खड्ड्यांमध्ये जमा झालेल्या पाण्यामध्ये अंघोळीसाठी गेले होते.

Continues below advertisement


मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. ही घटना इतर मित्रांनी शेजारील नागरिकांना सांगितल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मुलांना पाण्याबाहेर काढले.मात्र तोपर्यंत मुलांचा मृत्यू झाला असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. दोन्ही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आली आहेत. या घटनेप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या ठिकाणी नेहमीच पाण्यात बुडून मुलांचा दुर्दैवी मृत्यू होत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. प्रशासन आणखी किती मुलांचा जीव जाताना पाहणार असा संतप्त सवाल येथील स्थानिक नागरिकांनी केला आहे.


भिवंडीत काही दिवसांपूर्वी खदानीच्या खड्ड्यातील पाण्यात बुडून दोघा सख्या चुलत भावांचा मृत्यू झाला होता. भिवंडी शहरानजिक असलेल्या अंजूरफाटा  खारबाव रस्त्यावर खदानीच्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात खेळायला गेलेल्या दोघा सख्या चुलत भावांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. गणेश जोशी वय 10 वर्ष आणि पंकज जोशी वय 15 वर्ष अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.


पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास हे दोघे चुलत भाऊ या पाणी साचलेल्या ठिकाणी खेळायला आले होते. त्यांना शेतात पाणी साचल्याचा भास झाला व त्या पाण्यात तरंगत असलेल्या लाकडाच्या ओंडक्यावर दोघांनी उभे राहण्याचा प्रयत्न केला होता. त्याचवेळी ओंडका कलंडल्याने त्यावरील हे दोघे मुल पाण्यात पडले त्यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या इतर मुलांनी यांची माहिती कुटुंबीयांना दिल्या नंतर पाण्यात शोधाशोध करून या दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले होते. या प्रकरणी नारापोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.


 


इतर महत्वाच्या बातम्या


Bhiwandi Crime: कोयत्याने केक कापून दहशत माजवणाऱ्या बड्डे बॉयला बेड्या, धारदार कोयताही जप्त