Bhiwandi News: भिवंडी निजामपूर महापालिका क्षेत्रातील नालेसफाई योग्य वेळेत पूर्ण करण्यासाठी  कोट्यवधी रुपयांचा ठेका ठेकेदाराला देण्यात आला. मात्र ठेकेदाराचे सफाई कामगार नाल्यातून गाळ काढण्याऐवजी नाल्यात मासे पकडण्याचे काम करत असल्याची बातमी एबीपी माझाने दोन दिवसांपूर्वी दाखवली होती. एबीपी माझाच्या बातमीनंतर पालिका प्रशासन खडबडून जागी झाली आहे . एबीपी माझाने दाखवलेल्या व्हिडीओच्या आधारे महापालिका प्रशासनाकडून नालेसफाई करणाऱ्या ठेकेदाराला नोटीस बजावून दणका दिल्याची माहिती महापालिका उपआयुक्त दीपक झिंजाड यांनी दिली आहे. 


यंदा भिवंडी शहराला पुरासह मुसळधार पावसाचा फटका बसू नये म्हणून भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेने नाले आणि गटार सफाईचा दोन कोटी नऊ लाख 27 हजार 148 रुपयांचा ठेका ठेकेदाराला मंजूर केला. परंतु कोट्यवधी रुपये खर्च करून देखील दरवर्षी भिवंडीतील सखल भाग पावसाच्या पाण्याखाली जाऊन शेकडो नागरिकांच्या घरासह व्यापाऱ्यांच्या  दुकानात पाणी शिरत असल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे वास्तव्य दर पावसाळ्यात पाहवयास मिळत आहे. विशेष म्हणजे नाले आणि लहान गटारे सफाईचा ठेका मागील वर्षाच्या तुलनेत 28 टक्क्यांनी जास्त म्हणजेच 60 लाख रुपये ठेकेदाराला अधिक मंजूर करून  महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करून नाले आणि गटार सफाई करत आहे.


परंतु प्रत्यक्षात नालेसफाई ऐवजी काही कामगार मासे पकडण्याचे काम नाल्यात करीत असल्याचा  खळबळजनक व्हिडीओ दोन दिवसापूर्वी कामतघर परिसरात असलेल्या नाले सफाईवेळी  समोर आला होता.  त्यानंतर कामगार मासे पकडतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हा व्हिडीओ शहरातील  कमतघरमधील मंगल भवन कार्यालय, चंदन बाग परिसरातील असल्याची माहिती समोर आली होती. त्यातच नालासफाई व्यवस्थित न झाल्यामुळे दरवर्षी भिवंडी शहराला पुराचा फटका सहन करावा लागतो. मात्र कोट्यवधी रुपये खर्च करूनही नाल्यातून गाळ व कचरा काढण्या ऐवजी जर मासेमारी होत असेल तर नालेसफाई पूर्ण कशी होणार त्यामुळे संबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी नेटकऱ्यांकडून करण्यात येत होती. 


या मागणीची दखल घेऊन महापालिका  उपआयुक्त दीपक झिंजाड यांनी संबधित ठेकेदाराला नाले सफाई सोडून मासेमारी करत असाल तर आपले देयक थांबविण्यात येईल असा इशारा दिला. सोबत त्या ठेकेदाराला नोटीस बजावली आहे. शहरातील  नालेसफाईकडे महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी आपले लक्ष बारकाईने ठेवून आपली जबाबदारी पार पाडावी, अन्यथा पुन्हा दरवर्षी प्रमाणे भिवंडी शहराला  पुराचा फटका बसणार हे मात्र नक्की.