सांगली: नोकरीपेक्षा शेती कधीही उत्तम, हे सांगलीच्या विजय चौगुले यांचे विचार. याच विचारानं त्यांना आपल्या मुलाला बँकेतली नोकरी सोडायला लावली. त्याला शेतीचं महत्त्व पटवून त्याला शेतीत उतरवलं. आज त्यांचा मुलगा निखिल हा शेतीतून वर्षाला तब्बल 17 लाखांचं उत्पन्न कमावतोय.


सांगलीचा उच्चशिक्षित तरुण निखिल चौगुलेनं २००६ मध्ये पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर लगेच खासगी नोकरी मिळवली. मात्र वडील विजय चौगुले यांनी नोकरीऐवजी त्याला शेती करण्याचा सल्ला दिला. वडिलांचा आदेश मानत निखिलनंही शेतीत उतरुन केळी, ऊस आणि हळद ही तिहेरी पीकं पद्धती सुरु केली.

गेल्या वर्षी मे महिन्यात निखिलनं या जमीनीची नांगरट करुन त्यात हळदीची लागवड केली. आंतरपिकावर निखिलचा ठाम विश्वास, म्हणूनच या जून महिन्यात त्यानं हळदीच्या दोन ओळीत स्वीट कॉर्नचं बी टोकण केलं. आता अवघ्या ७५ दिवसात पीक काढणीस आलं आहे. कणसं आणि चारा विकून ५० हजार रुपये मिळाले आहेत.

सध्या निखिल घेत असलेल्या हळद पीकाला नऊ महिने पूर्ण झाले, असून हळदीची काढणी सुरु आहे. त्यानं घेतलेल्या हळदीच्या पीकाचा एका गड्डा साडे तीन ते चार किलो वजनाचा गड्डा दिसून येत आहे. यातून पॉलिश केल्यानंतर ३५ ते  ४० क्विंटलपर्यंत हळदीच्या उत्पादनाची अपेक्षा आहे .

हळदीला बाजरपेठेत क्विंटलला ८ ते १२ हजार रुपये दर मिळतो. यातून एका शेतकऱ्याला एकरी चार लाख रुपये मिळतात. पण निखिलला बियाणं, खतं आणि मजूरी मिळून एकरी दीड लाखांचा खर्च आला आहे. हा सर्व खर्च वजा जाता त्याला एकरी तीन लाखाचे उत्पन्न अपेक्षित आहे . म्हणजे दोन एकरमधून सहा लाखाचे निव्वळ उत्पन्न त्यानं ग्राह्य धरलं आहे.

ठिबक सिंचन , योग्य पद्धतीनं लागवड , खत व्यवस्थापन यामुळं अधिक उत्पादन मिळविणं निखिलला शक्य झालंय. याशिवाय केळीतून त्यानं आठ लाख, स्वीट कॉर्न पिकातून चाळीस हजार, ऊस पिकातून ३ लाख मिळाले निखिलला मिळाले आहेत. आता हळदीतून सहा लाख म्हणजे या दहा एकरातून खर्च वजा जाता वर्षाला १७ लाख रुपये मिळणार आहेत.

दहा वर्षे नोकरी करुनही एवढा पैसा निखिलला दिसला नसता, त्यामुळं आज निखिल अभिमानानं सांगतोय, होय मी शेतकरी आहे.