Strawberry Moon 2023 : जून महिन्याच्या पहिल्या पौर्णिमेला आकाशात एक सुंदर आणि मनमोहक दृश्य पाहायला मिळालं. पौर्णिमेला जगभरातील लोकांनी आकाशात स्ट्रॉबेरीप्रमाणे चमकणाऱ्या चंद्राचं रुप डोळ्यात कैद केलं. अनेकांनी हा क्षण त्यांच्या मनात तर काहींनी कॅमेऱ्यात कैद केला. वटपौर्णिमेला हा खास योग आला होता. याचे फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. जगभरातील लोकांनी हा खास 'स्ट्रॉबेरी मून' पाहण्याचा आनंद घेतला. 'स्ट्रॉबेरी मून' ला 'रोझ मून' (Rose Moon) असंही म्हटलं जातं. इंटरनेटवर नेटकऱ्यांनी चंद्राचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. यामध्ये गुलाबी रंगाचा चंद्र रात्रीच्या आकाशात चमकताना दिसत आहे.


स्ट्रॉबेरी मून कशाला म्हणतात?


'स्ट्रॉबेरी मून' या नावावरून तुम्ही त्याचा अर्थ गुलाबी रंगाचा चंद्र असा लावत असाल, तर असं काहीही नाही. 'स्ट्रॉबेरी मून' चा अर्थ गुलाबी चंद्र असा नाही. अमेरिकेतील आदिवासी जमातींनी जून महिन्याच्या पौर्णिमेला 'स्ट्रॉबेरी मून' हे नाव दिलं आहे. एका रिपोर्टनुसार, स्ट्रॉबेरी मून हे नावअल्गोनक्विन, ओजिब्वे, डकोटा आणि लकोटा लोकांद्वारे पहिल्यांदा वापरण्यात आलं होतं. कारण जूनमध्ये स्ट्रॉबेरी काढणी केली जाते तेव्हा पौर्णिमेला दिसणाऱ्या चंद्राला 'स्ट्रॉबेरी मून' असं म्हटलं जात असावं आहे.


काय आहे 'सूपरमून'चं रहस्य?


चंद्र (Moon) पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करतो. चंद्र त्याच्या कक्षेत सर्वात जवळ किंवा दूर असणे याला 'अप्सिस' (Apsis) असं म्हणतात. चंद्र पृश्वीभोवती (Earth) त्याच्या कक्षेत जवळ आला तर तो आकाराने मोठा दिसतो. याउलट चंद्र पृश्वीभोवती त्याच्या कक्षेत दूर गेला तर तो आकाराने लहान दिसतो. ज्या दिवशी चंद्र पृथ्वीला प्रदक्षिणा करताना कक्षेत सर्वात जवळ येतो, त्यामुळे आकाराने मोठा दिसतो. याला सूपरमून किंवा स्ट्राबेरी मून असंही म्हणतात. 


इतरही अनेक कथा प्रचलित


दरम्यान, युरोपमध्ये याला 'रोझ मून' म्हणतात. यासोबतच 'स्ट्रॉबेरी मून'ला 'हनी मून' आणि 'हॉट मून' या नावांनीही ओळखलं जातं. स्ट्रॉबेरी मूनचे आकर्षक फोटो लोकांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आणखी एका रिपोर्टच्या मते, जून महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या रंगाशी 'स्ट्रॉबेरी मून'चा काही संबंध नाही, हे प्राचीन परंपरेशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ असतो, तेव्हा चंद्राचा आकार इतर दिवसांच्या तुलनेत 14 टक्के मोठा आणि चमकदार दिसतो. या कारणामुळे याला 'रोझ मून' किंवा 'हॉट मून' म्हटलं जातं असावं.


वटपौर्णिमेला दिसतो 'स्ट्रॉबेरी मून'


हिंदू धर्मानुसार जेष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा असं म्हणतात. अमेरिकेतील आदिवासी जमाती जून महिन्यातील पहिल्या पौर्णिमेला 'स्ट्रॉबेरी मून' म्हणतात. हिंदू धर्मात, वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिला वटवृक्षाची पूजा करतात.