Bats Always Hang Upside Down : रात्रीच्या आकाशात तुम्ही वटवाघुळांना (Bats) उडताना पाहिलं असेलच. आकाशात उडणारी वटवाघुळं ही सत्सन प्राणी आहेत. वटवाघुळांना तुम्ही अनेकदा बंद विजेच्या तारांवर, बिल्डींगच्या टेरेसवर किंवा झाडांवर उलटं लटकताना पाहिलं असेल. या वटवाघळांची सर्वात मोठी आणि अनोखी गोष्ट म्हणजे ते उलटे लटकतात. वटवाघळांचं नाव घेताच क्षणी आपल्याला उलटी लटकणारी वटवाघळं डोळ्यांसमोर उभी राहतात. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की वटवाघळं नेहमी उलटी का लटकतात? नसेल तर आज आम्ही तुम्हाला वटवाघळांशी काही महत्त्वाच्या आणि रंजक गोष्टी सांगणार आहोत.
वटवाघळं उलटी का लटकतात?
वटवाघुळं उलटी लटकण्यामागचं कारण म्हणजे ते उलटे राहून सहज उडू शकतात. खरंतर, वटवाघुळं इतर पक्ष्यांप्रमाणे जमिनीवरून उडू शकत नाहीत. आकाशात उडण्यासाठी जेवढी उचल गरजेची असते त्यांचे पंख तेवढी उचल देऊ शकत नाहीत. याशिवाय त्यांचे मागचे पाय लहान आणि अविकसित असतात. त्यामुळे ते धावतानाही वेग पकडू शकत नाहीत.
झोपताना वटवाघळं का पडत नाहीत?
वटवाघुळांना आपण उलटे लटकताना पाहिले आहे. पण, वटवाघळं उलटी झोपतात सुद्धा. मग असा प्रश्न पडतो की, उलटे झोपत असताना त्यांचा तोल जाऊन ते पडत कसे नाहीत? एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, याचं कारण म्हणजे त्यांच्या पायांच्या नसा अशा प्रकारे विकसित केलेल्या असतात. त्यांचे वजन त्यांना पंजे घट्ट धरून ठेवण्यास मदत करतात.
वटवाघुळं पक्ष्यांच्या श्रेणीत येत नाहीत
अर्थातच वटवाघळांना पंख असतात आणि ते पक्ष्यांप्रमाणे आकाशात उडतात. पण प्रत्यक्षात ते पक्षी नसून उडणारे सत्सन प्राणी आहेत. खरंतर, वटवाघुळं अंडी न देता थेट बाळांना जन्म देतात आणि आपल्या बाळांना स्तनपानही करतात. त्यामुळे ते पक्ष्यांच्या श्रेणीत येत नाहीत.
रक्त पिणारे वटवाघुळंही असतात
जगात वटवाघळांच्या एक हजारांहून अधिक प्रजाती आहेत. ज्यामध्ये फ्लाइंग फॉक्स प्रजातीची वटवाघळं सर्वात मोठी आहेत. फ्लाइंग फॉक्स वटवाघळांच्या शरीराची लांबी 40 सेमीपर्यंत असते. काही वटवाघुळं इतर प्राण्यांचे रक्त पिऊन जगतात. अशा वटवाघळांना व्हँपायर बॅट म्हणतात.
महत्त्वाच्या बातम्या :