Trending News : आतापर्यंत एखाद्या मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी डीएनए टेस्ट केल्याचं आपण ऐकलंय. तसेच, एखाद्या हरवलेल्या मुलाच्या खऱ्या पालकांचा शोध घेण्यासाठी डीएनए टेस्ट केली जाते. पण तुम्ही कधी एखाद्या म्हशीचा खरा मालक शोधण्यासाठी डीएनए चाचणी केल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? उत्तर प्रदेशात असं केलं जाणार आहे. बऱ्याचदा चरायला गेलेल्या म्हशी पुन्हा घरी परत येत नाहीत किंवा चोरीला जाातत. यावर तोडगा काढण्यासाठी पोलिसांनी थेट डीएनए टेस्ट करण्याचा निर्णय घेतला.
उत्तर प्रदेशातील शामली येथील म्हशीचा खरा मालक कोण? याचं उत्तर शोधण्यासाठी आता त्यांची डीएनए चाचणी केली जाणार आहे. जनावराच्या खऱ्या मालकाची ओळख पटवणं पोलिसांना अवघड होत होतं. त्यानंतर जिल्ह्याचे एसपी सुकीर्ती माधव यांनी म्हशीची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतला आणि सर्वांना एकच धक्का बसला.
शाल्मली येथे दोन वर्षांपूर्वी झालेल्या म्हशींच्या चोरीचं रहस्य उलगडण्यासाठी म्हैस आणि तिला जन्म देणाऱ्या म्हशीचा (मादी) डीएनए नमुना घेण्यात आला आहे. पोलीस आता हे नमुने राज्याबाहेरील प्रयोगशाळेत पाठवणार आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
25 ऑगस्ट 2020 रोजी झिंझाना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अहमदगड गावात राहणाऱ्या चंद्रपाल कश्यप नावाच्या मजुराच्या घरातून ऐक म्हैस चोरीला गेली. चंद्रपालच्या म्हणण्यानुसार, त्यांची म्हैस नोव्हेंबर 2020 मध्ये सहारनपूरच्या बीनपूर गावात सतबीर सिंह यांच्या घरी सापडली होती.
पण, सतबीरनं ही म्हैस आपली असल्याचं सांगत चंद्रपालनं केलेला चोरीचा दावा फेटाळून लावला. त्यानंतर, कोविड महामारीमुळं या प्रकरणातील कायदेशीर प्रक्रिया पुढे जाऊ शकली नाही. परंतु, त्यानंतर पुन्हा या प्रकरणानं डोकं वर काढलं. यावर एसपी शामली सुकीर्ती माधव यांनी म्हशीचा खरा मालक शोधण्यासाठी डीएनए चाचणी करण्याचे आदेश दिले. कारण तक्रारदार चंद्रपाल यांनं केलेल्या दाव्यानुसार, चोरीला गेलेल्या म्हशीला जन्म देणारी म्हैस त्याच्याकडेच आहे.
पीडित चंद्रपाल कश्यप यांनं सांगितलं की, माणसांप्रमाणेच प्राण्यांमध्येही वेगवेगळी वैशिष्ट्य असतात. त्याच्या चोरलेल्या म्हशीच्या डाव्या पायावर खुणा असून शेपटीचे टोक पांढरं आहे. चंद्रपालनं सांगितलं की, प्राण्यांनाही स्मरणशक्ती असते. मी जेव्हा जेव्हा माझ्या म्हशीजवळ जायचो, तेव्हा ती मला ओळखायची आणि माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायची. मला माझ्या दाव्यावर पूर्ण विश्वास आहे आणि डीएनए चाचणी पूर्ण झाल्यानंतर परिस्थिती स्पष्ट होईलच, असंही तो म्हणाला.
डीएनए चाचणी हा एकमेव पर्याय
एसपी सुकीर्ती माधव यांनी डीएनए चाचणीचे आदेश दिल्यानंतर पोलिसांसह पशुवैद्यकीय डॉक्टरांचं पथक आमदगड आणि बिनपूर गावात पोहोचलं. येथून डॉक्टरांनी दोन्ही जनावरांचे नमुने घेतले. एसपी सुकीर्ती माधव म्हणाले की, प्राण्यांचे खरे मालक कोण? हे शोधणं खरोखरच आव्हानात्मक होतं. चोरीच्या प्राण्यांची आई आपल्याकडे असल्याचा दावा तक्रारदारानं केला होता, त्यामुळे आम्ही डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतला.